गणेश इंगवले
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी याकरिता महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आज महानगरपालिकेच्या नेरूळ व ऐरोली येथील रूग्णालयांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला तसेच कोपरखैरणे व तुर्भे येथील माता बाल रूग्णालये कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने त्याठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त शहर श्री. अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त सेवा श्री. रमेश चव्हाण, शहर अभियंता श्री. मोहन डगांवकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रमेश निकम तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या पाहणी दौ-यात आयुक्तांनी नेरूळ व ऐरोली येथील रूग्णालयांना भेट देऊन तेथील रूग्णसेवेची बारकाईने पाहणी केली. यावेळी तेथील अधिकारी – कर्मचारी यांच्याकडून माहिती घेतानाच त्यांनी रूग्णांशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या अनुषंगाने डॉक्टर्सची कमतरता दूर करण्यासाठी भरतीबाबत त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच रूग्णालयात आवश्यक उपकरणांची कमतरता लक्षात आल्याने ती दूर करण्यासाठी गतिमान कार्यवाही करण्यात यावी असे त्यांनी सूचित केले.
तु्र्भे येथील बंद असलेल्या माता बाल रूग्णालयाच्या इमारतीची पाहणी त्यांनी केली. या इमारतीचे नुतनीकरण निविदा प्रक्रियेत असून त्याकरिता आवश्यक कार्यवाही विशेष लक्ष देऊन विनाविलंब करण्याची सूचना त्यांनी अभियांत्रिकी विभागास दिल्या.
अशाचप्रकारे कोपरखैरणे येथील बंद असलेल्या माता बाल रूग्णालयाची इमारत नव्याने बांधण्यात येणार असून त्या बांधकामाबाबत त्वरित पावले उचलावीत असे निर्देश आयुक्तांनी दिले. तोपर्यंत या विभागातील रूग्णांची गैरसोय होऊ नये व येथील रूग्णांचा वाशी व ऐरोली येथील रूग्णालयांवर पडणारा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी कोपरखैरणे विभागात पर्यायी जागा भाड्याने घेऊन त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात रूग्णालय सुरू करावे असे निर्देश त्यांनी दिले.
नवी मुंबईकर नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा देणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे, त्यामुळे आज आरोग्य सेवेच्या प्रत्यक्ष पाहणी दौ-यात केलेल्या सूचनांवर तत्परतेने कार्यवाही करून रूग्णांना दिलासा देण्याकरिता कालमर्यादित काम करावे अशा सूचना संबंधित विभागांना महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचेमार्फत देण्यात आल्या असून याबाबतच्या कार्यवाहीचा नियमित आढावा घेण्यात येईल असे त्यांनी सूचित केले.