मुंबई : राज्यात व केंद्रात सत्तेमध्ये सहभागी व्हायचे आणि शेतकरीप्रकरणी सरकारवर टीका करायची असे सध्या शिवसेेनेचे राजकारण सुरू आहे. केंद्रात व राज्यात सरकारची भूमिका पटत नसेल तर सरकारमध्ये कशाला राहता, एकीकडे सत्तेचा मोहही सुटत नाही आणि सत्तेत राहून विरोधकासारखे वागायचे अशी सध्या शिवसेनेकडून राजकारणात दुटप्पी भूमिका वापरली जात असल्याची टीका राजस्थान कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांनी केली.
केंद्र सरकारच्या तीन वर्षाच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी मुंबई प्रदेश कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पायलट यांनी शिवसेनेवर ही टीका केली.
राजीनामे देण्याची भाषा करणारी शिवसेना राजीनामेही देत नाही व सत्ताही सोडत नाही. शिवसेनेची ही दुटप्पी भूमिका आता महाराष्ट्रातील जनतेच्याही लक्षात आलेली आहे. शिवसेनेला सत्तेचा मोह असल्याने ते केंद्रात व राज्यातील सत्तेत सहभागी आहेत. कॉंग्रेसने कधीही अशी दुटप्पी भूमिका घेतली नाही. कॉंग्रेसनेच रस्त्यावर उतरून शेतकर्यांच्या समस्येवर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शेतकर्यांसाठी संघर्ष यात्रा काढली. कॉंग्रेसकडून होत असलेल्या विरोधामुळेच मुख्यमंत्री फडणवीस गेल्या दोन दिवसापासून शेतकरीप्रकरणी आपली भूमिका बदलू लागले असल्याचे पायलट यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेचे शेतकरीप्रेम आता जनतेलाही समजले आहे. त्यांना सत्तेची लालसा असल्याने त्यांनी आजवर सत्ता सोडली नाही. शिवसेनेचा आता खरा चेहरा उघड झाला असल्याची टीका पायलट यांनी यावेळी केली.