गणेश इंगवले
नवी मुंबई : राज्यातील बळीराजा १ जुनपासून संपावर गेल्याचा फायदा उचलत परराज्यातील शेतकर्यांनी आपल्या भाज्या मुंबईतील मार्केटमध्ये पाठविण्यास सुरूवात केली आहे. आपल्या राज्यापेक्षा मुंबईत भाज्यांना अधिक भाव मिळतो आणि भाजी विक्रीचे पैसेही रोखीच्या स्वरूपात मिळत असल्याचे तेथील शेतकर्यांचे व व्यापार्यांचे म्हणणे आहे. आपल्या मागण्यांसाठी संपावर गेलेल्या बळीराजाला आता परराज्यातील शेतकर्यांच्या भाज्यांच्या आक्रमणाचा नव्याने सामना करावा लागणार आहे.
१ जुनपासून बळीराजा संपावर गेल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तसेच कल्याण-डोंबिवली, बोरिवली, ठाणे, दादर-भायखळा येथील स्थानिक बाजारांमध्ये भाज्या येणार नाहीत. परिणामी शहरवासियांची पर्यायाने राज्य सरकारची कोंडी निर्माण होवून बळीराजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात येईल असे सर्वत्र बोलले जात होते. पण संपामुळे उलटेच चित्र निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.
२ जुलैपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये दिल्ली, बँगलोर, सिमला, कोलकत्ता, मध्यप्रदेश, गुजरात या बाहेरील राज्यातील भाज्या मोठ्या प्रमाणावर विक्रीला येवू लागल्या आहेत. या आठ दिवसाच्या कालावधीत मुंबई मार्केटमधील व्यापार्यांनी येथील शेतकर्यांशी तसेच व्यापार्यांशी संपर्क करून व्यापाराच्या जुळवाजुळवीला सुरूवात केली आहे. परराज्यातील शेतकर्यांना त्यांच्या राज्यापेक्षा मुंबईतील बाजारामध्ये अधिक भाव मिळत आहे. याशिवाय पैसे लवकर भेटतात. त्यांच्या राज्यात भाज्यांना चांगला दर भेटत नाही आणि व्यापारी दोन-अडीच महिने पैसेही देत नसल्याचे काही शेतकर्यांकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या संपामुळे परराज्यातील व्यापार्यांना मुंबई शहर व उपनगराची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. याशिवाय परराज्यातील शेतकर्यांनी व तेथील व्यापार्यांनी भाजी विक्रीच्या पैशासाठी एक ते दीड महिने थांबण्याचीही तयारी दर्शविल्याने महाराष्ट्रातील शेतकर्यांपुढे नव्याने संकट उभे ठाकले आहे.