गणेश इंगवले
नवी मुंबई : कुडवली, मुरबाड येथील मे. ब्रहन महाराष्ट्र स्टिल लि. या कंपनीत गेल्या २५ वर्षांपासून लोकनेते गणेश नाईक संस्थापित श्रमिक सेना युनियन कामगारांचे प्रतिनिधीत्व करीत आहे. कंपनीतील या मान्यताप्राप्त युनियनच्या वतीने कामगारांसाठी ११,५०० रुपयांचा भरघोस पगारवाढीचा करार शनिवार, १७ जुन रोजी करण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीतील कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुरबाड एम.आय.डी.सी.मध्ये झालेला हा ऐतिहासिक पगारवाढीचा असा करार आहे.
पगारवाढीच्या करारावर युनियनच्या वतीने अध्यक्ष डॉ.संजीव गणेश नाईक, सरचिटणीस चरण जाधव, कामगार प्रतिनिधी श्याम विशे, बाळु जमदारे, गुरुनाथ कडव, चंद्रकांत पाटकर, किशोर भोईर आणि बारकु लाटे यांनी तर कंपनीच्या वतीने मनुष्यबळ विकास विभागाचे सरव्यवस्थापक हेमंत शिंदे आणि व्यवस्थापक रमेश गुजरे यांनी सहया केल्या. या भरघोस पगारवाढीच्या करारासाठी कंपनीतील कामगारांनी लोकनेते गणेश नाईक आणि कंपनीचे मालक एस.एम.सराफ यांना धन्यवाद दिले आहेत.
हा करार ऑगस्ट २०१७ ते जुलै २०२० या कालावधीसाठी आहे. कंपनीतील सर्व कामगारांना कराराची थकबाकी ऑगस्ट २०१६ ते जुन २०१७ या कालावधीसाठी सरासरी १७ हजार रुपये मिळणार आहे. कामगारांना एक सणाची(रक्षाबंधन)सुटटी वाढवून देण्यात आली आहे. कामगारांनी कंपनी व्यवस्थापनास उत्पादनवाढीची आणि गैरहजेरी बददल हमी दिली आहे. श्रमिक सेना युनियनच्या वतीने जुलै २०१६मध्ये कंपनीकडे कामगारांच्या पगारवाढीचे मागणीपत्र सादर करण्यात आले होते. त्यानंतर युनियनचे अध्यक्ष डॉ.नाईक आणि सरचिटणीस जाधव यांनी कंपनी व्यवस्थापनाशी वेळोवेळी बैठका घेवून अखेर १७ जुन रोजी हा ऐतिहासिक पगारवाढीचा करार घडवून आणला.