गणेश इंगवले
मुंबई : मुंबई : राज्यात शेतकर्यांची कर्जमाफी व पीकासाठी १० हजार रूपयांचे हमीकर्ज यावरून महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ गेल्या काही दिवसापासून तणावात वावरत असताना वनेमंत्री सुधीर मनगुंटीवार आणि त्यांचा विभाग वृक्षारोपणासाठी जय्यत तयारी करत असल्याचे राज्यातील घडामोडीवरून पहावयास मिळत आहे.
हरित महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगून काम करणारे वने मंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी येत्या तीन वर्षात ५० कोटी वृक्षारोपणाचा संकल्प मनाशी बाळगला आहे. १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल ४ कोटी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या वृक्षारोपणाच्या अपडेटसाठी राज्य सरकारने ‘सॉफ्टवेअर’ बनविले असून या माध्यमातून दररोज कोणत्या ठिकाणी किती वृक्ष लावण्यात आले आहेत व त्या वृक्षाची काय अवस्था याची इंत्यभूत माहिती राज्य सरकार संकलित करणार आहेत.
गेल्या वर्षी मनगुंटीवार यांनी २ कोटी वृक्षारोपणाचा संकल्प सोडला होता. तथापि १ जुलै २०१६ या एकाच दिवशी तब्बल २ कोटी ८२ लाख वृक्षारोपण करण्यात आले. याही वर्षी १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत तब्ल ४ कोटी वृक्षारोपण राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचा संकल्प वनेमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी सोडला आहे. सामाजिक संस्था, शासकीय यंत्रणा यांच्या मदतीला हरित सेना यावेळी वृक्षारोपणासाठी मदत करणार आहे. आतापर्यत ३५ लाखाहून अधिक हरित सेनेचे सदस्य झाल्याने वने विभागाचा उत्साहही दुणावला आहे.