शेतकरी संपाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राशी संबंधित वातावरण ढवळून निघाले आहे. कर्जमाफीसह, शेतीमालाला हमी भाव यासह अन्य मागण्यांना सरकारदरबारी न्याय मिळत नसल्याचे पाहून अन्नदात्या बळीराजाला अखेर संपाचे हत्यार उपसावे लागले आहे. बळीराजा संपावर जाणे ही त्या राज्याला आणि तेथील राज्यकर्त्यांना नक्कीच भूषणावह बाब नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ऑॅक्टोबर २०१४ नंतर महाराष्ट्र राज्याचा गाडा हाकताना स्वत:च्या स्वच्छ प्रतिमेला कधीही तडा जावू दिला नाही. पण त्यांच्याच काळात बळीराजा संपावर जाणे हा त्यांच्या प्रतिमेला निश्चितच लागलेला एक डाग म्हणावा लागेल. ग्रामीण भागात संप यशस्वी ठरत असताना मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोबिवली, पनवेलसारख्या शहरी भागात या संपाचे पडसाद उमटलेच नाहीत. याला कारण म्हणजे शहराकडील मुलाला गावाकडच्या बापाची किंमत राहीली नाही, असेच म्हणावे लागेल.
१ जुनपासून राज्यातील बळीराजा संपावर गेला. ठिकठिकाणच्या शेतकर्यांनी आपल्या शेतातील माल रस्त्यारस्त्यावर फेकून दिला. दुधाचे टॅकर रस्त्यावर ओतून दिले. अर्थात बळीराजाने हे स्वखुशीने केले नाही. हे सर्व करताना बळीराजाला झालेल्या वेदना या फक्त आणि बळीराजालाच ठाऊक असणार. स्वत:च्या हाताने आपल्या भाजीमालाची नासाडी करताना आणि आपल्या दुभत्या जनावरांचे दुध रस्त्यावर फेकून देताना बळीराजाची अवस्था नक्कीच पाण्यातल्या माशासारखी झाली असणार. पाण्यात फिरणार्या माशाचे अश्रू कोणाला दिसत नाहीत.
शहरी भागातल्या लोकांना १ जुनपासून बळीराजाच्या संपाचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे घडामोडीवरून पहावयास मिळत आहे. शहरातील लोकांचे व्यवहार नियमितपणे सुरू आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकर्यांच्या भाज्या बाजारात येत नाहीत, दुसर्या राज्यातील शेतकर्यांच्या भाज्या बाजारात येवू लागल्या आहेत. त्यामुळे शहरवासियांच्या जेवणाच्या ताटात भाज्या उपलब्ध झाल्या, त्यांना परराज्यातील शेतकर्यांनी पाठविलेल्या भाज्यांमुळे संपाची कोणतीही झळ बसली नाही. त्यामुळे बळीराजाच्या संपाविषयी तटस्था बाळगण्याला शहरवासियांनी प्राधान्य दिले. त्यामुळेच खर्या अर्थांने राज्यातील खेड्यापाड्यामध्ये विखुरलेल्या बळीराजाला अधिक दु:ख झाले आहेत. अंगावर कुर्हाडीचे घाव झेलणार्या वृक्षाला लाकूडतोड्याविषयी राग येत नाही. कारण लाकूड तोडणे उपजिविका भागविणे हे लाकूडतोड्याचे कर्मच आहे. पण त्या लोखंडी कुर्हाडीला लागलेला दांडा हा वृक्षापासूनच बनलेला आहे, याचे अतीव दु:ख त्या वृक्षाला होते. त्या वृक्षासम अवस्था आज या संपाच्या काळात बळीराजाची झालेली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात राहणारा शहरवासी कोणा दुसर्या देशातून आलेला नसून स्वत: बळीराजाचीच मुले उपजिविकेसाठी शहरात आलेली आहे. संपकाळात आपण आपल्या ग्रामीण भागातील बांधवांच्या, नातलगांच्या, वडीलांच्या मागे उभे राहू नये याची साधी जाणिवही शहरी भागातील बळीराजाच्या मुलांना होवू नये हीच खर्या अर्थांने बळीराजाची शोकांतिकाच म्हणावी लागेल.
संप सुरू झाल्यावर आपल्या गावाकडे संपर्क करून नुकसान किती झाले याची चौकशी करण्याऐवजी शहरवासी मार्केटमध्ये भाज्या आल्या आहेत का, दुधाचे टॅकर आले नाही ना, मग मॉलमध्ये, किराणा मालाच्या दुकानामध्ये दुधाची पावडर शिल्लक आहे का, याची चौकशी करताना पहावयास मिळाला. रोजगारासाठी, उपजिविकेसाठी बळीराजाची मुले शहरात आली असली तरी त्याचे बालपण, शिक्षण गावाकडेच झाले आहे, आपले आई-वडील, भाऊ-चुलत भाऊ व अन्य नातलग आजही शेतीवरच उपजिविका भागवित आहे, याचीही त्याला माहिती असणार.
गावाकडे थोडा जरी वारा आला, वादळ आले तरी टॉमटो, वालवडीच्या बागा झटकन कोसळतात. काठ्या तुटतात. पुन्हा बाग उभी करायला माणसे मजुरीने आणायला लागतात. सुतळ, तारेचा खर्च करावा लागतो. सकाळी उठून दात न घासता हातात ब्लेड घेवून शेतातीत दुधी भोपळा तोडणे, तो वाहून आणणे, त्याला कागदाची पॅकिंग करून पोती भरून हुंडेकरीपर्यत पोहोचविणे. यातच सांयकाळचे पाच ते सहा वाजतात. मगच बळीराजा व त्याच्या घरातील जेवायला बसतात. जेवल्यावर आराम न करता घरातील कोणीतरी लगेचच दुधीच्या शेताला पाणी भरायला जातो. लगेचच दुसर्या दिवशी काकडीच्या शेतात हाच कार्यक्रम असतो. कांदा पिकविल्यावर ग्रामीण भागात कांदा सुटा न विकता शेतातील सर्व कांदा लमसम भावाने एकदाच विकायची आजही प्रथा आहे. कांद्या विक्रीयोग्य झाल्यावर व्यापारी शेत पाहायला येणार म्हटल्यावर शेतकरी आपल्या शेतात फिरून ज्या ठिकाणी दुभाळका कांदा असेल अथवा तुरा आला असेल त्या ठिकाणी जावून तुरा खोडण्याचे काम करतो.
आज ग्रामीण भागात ऊसामध्ये वाघ आणि बिबट्यांचा संचार वाढला आहे. त्या ऊसाच्या पिकामध्ये शेतकरी कांदा व लसून अशी पिके घेतो. ऊस कमरेएवढा होईपर्यत आजही ऊसामध्ये कांदा व लसणाचे पीक काढले जाते. केळीच्या बागामध्ये गहू काढला जातो. भारनियमनाच्या काळात रात्रीचा दिवस करून शेतात पाणी भरून शेतातील पीके जगवावी लागतात. उन्हाळ्याच्या कालावधीत पाण्याची पातळी खाली गेल्यावर जेमतेम दोन तास विहीरीतील मोटर चालवून पीके जगविली जातात. आपल्या गावाकडे आई-बापाला, भावाला आणि अन्य नातलगांना शेती करताना किती कष्ट पडतात याची शहरात आलेल्या बळीराजाच्या मुलाला पूर्णपणे जाणिव आहे. अशा परिस्थितीत बळीराजाच्या शहरातील मुलांनी बळीराजाच्या मागे खंबीरपणे उभे राहणे काळाची गरज होती. गावाकडे बाप शेती करतो, म्हणून उन्हाळ्यात, दिवाळीच्या सुट्टीत गावी आल्यावर गव्हाची, बाजरीची पोती आपणास शहराकडे आणता येतात. बाप साखर कारखान्यात उस पाठवितो म्हणून आपण हक्काने कारखान्यातून स्वस्तात साखर विकत आणतो. या सर्व गोष्टीची जाणिव बळीराजाच्या शहरातील मुलांनी ठेवली असती तर ग्रामीण भागात बळीराजाने सुरू केलेल्या संपाचे पडसाद शहरावरही उमटले असते आणि महाराष्ट्र सरकारला लवकरात लवकर बळीराजाच्या गार्हाण्याला दाद द्यावी लागली असती. परंतु शहराकडे असणार्या बळीराजाच्या मुलांनेच संपाप्रती अलिप्तता दाखवित खर्या अर्थांने बिभिषणाची भूमिका बजावली आहे.
एपीएमसी मार्केटमध्ये असणार्या व्यापारी वर्ग, माथाडी वर्ग हाही शेतकर्याच्याच घरातुन शहरामध्ये आलेला आहे. व्यापार्यांनी कोणतीही भाजी विकली नसती, माथाडींनी गाड्या खाली केल्या नसत्या तर आज शेतकर्याच्या संपाबाबत वेगळेच चित्र निर्माण झाले असते. परराज्यातून माल येतो, विकला जातो. त्यामुळे बळीराजाच्या संपाला खिळखिळे करण्याचे काम सर्वप्रथम सरकारने न करता बळीराजाच्या मुलांनीच केले असल्याचा संदेश राज्यात सर्वत्र गेला आहे. दहा-पंधरा दिवस परराज्यातून येणारा भाजीमाल खाल्ला नसता तर काही शहरातील बळीराजाचा मुलगा उपाशी मेला नसता. पण तसे घडले नाही. त्यामुळेच आज बळीराजाच्या संपाची उपेक्षा झाली आहे.