गणेश इंगवले
मुंबई : : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांच्या तीन दिवसीय महाराष्ट्र दौर्यात मुंबई भेटीदरम्यान शाहांनी पक्षसंघटनात्मक बाबींवरच विशेष भर दिला आहे. भाजपा आमदारांना मध्यावधी निवडणूक लढविण्याची इच्छा नसतानाही शाहा यांना भेटीदरम्यान आपली भूमिका स्पष्ट करण्याचे भाजपा आमदारांचे धाडस झाले नाही. अमित शाहांकडून फक्त सांगितले जाते, ऐकले जात नाही असा काही भाजपा आमदारांकडून नाराजीचा सूर आळविला जावू लागला आहे.
अमित शाहा यांनी महाराष्ट्र भेटीदरम्यान ‘शत-प्रतिशत भाजपा’ हा पक्षविस्ताराचा जुनाच नारा पुन्हा आळविला जावू लागला आहे. संघटनात्मक आढावा असे या दौर्याचे स्पष्टीकरण भाजपाकडून राजकीय पातळीवर देण्यात येत असले तरी मध्यावधी निवडणूका झाल्यास कितपत तयारी याची शाहांकडून या दौर्यात खर्या अर्थांने चाचपणी करण्यात आली.
पक्षसंघटनेचा आढावा घेताना मंत्रिमंडळाचे कामकाज आणि राष्ट्रपती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मित्र पक्षांची मनधरणी असे विविध हेतू अमित शाहांकडून साध्य करण्यात आले आहे. अमित शाहांनी पक्षसंघटनात्मक कामासाठी हा तीन दिवसीय दौरा आयोजित केला असला तरी आमदार व पक्षीय पदाधिकार्यांसी सुसंवाद अमित शाहांना साधता आला नसल्याचे भाजपातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
अमित शाहा फक्त विचारतात, ऐकून घेत नाही असा नाराजीचा सूर शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील भाजपा आमदारांकडून आळविला जावू लागला आहे. भाजपाकडून मध्यावधी निवडणूकीची चाचपणी आणि तयारीचा आढावा या दौर्यात घेण्यात आला असला तरी मध्यावधी निवडणूकींना सामोरे जाण्याची अनेक भाजपा आमदारांची मानसिकता नाही. तुर खरेदी प्रकरण, शेतकरी संप, कर्जमाफीचे निकष या पार्श्वभूमी ग्रामीण भागातील आमदार शेतकर्यांच्या नाराजीमुळे धास्तावले आहेत. या परिस्थितीत मध्यावधी निवडणूका झाल्यास निवडणूकीत आपला टांगा पलटी होण्याची भीती भाजपा आमदार आपसात चर्चा करताना व्यक्त करत आहेत.
अनेक आमदारांना मध्यावधी निवडणूकांविषयी आपले मत अमित शाहाजवळ मांडण्याची इच्छा असूनही मत मांडण्याची हिंमत ते दाखवू शकले नाहीत. अनेक जिल्हाध्यक्षदेखील आपल्या जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये भाजपाविरोधी वारे वाहत असल्याचे मान्य करू लागले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा मध्यावधीसाठी आग्रही असले तरी आता मध्यावधी झाल्यास सभागृहात आहे तो आकडाही भाजपाला गाठता येणार नसल्याची भीती भाजपाच्या प्रदेश पदाधिकार्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सैनिकांची मध्यावधी निवडणूकांची इच्छा नसतानाही सेनापती मात्र मध्यावधी निवडणूकीची भाषा बोलत असल्याचे अमित शाहांच्या दौर्यामध्ये भाजपाच्या छावणीत पहावयास मिळाले. भाजपा जिल्हाध्यक्ष व आमदारांची मध्यावधी निवडणूकीची मानसिकता नसतानाही भाजपा निवडणूकीला कसे सामोरे जाणार याचा चिंतेचा सूर भाजपा कार्यकर्त्यांकडून आळविला जावू लागला आहे.