साईनाथ भोईर / नवी मुंबई
पावसाळा सुरू झालेला असतानाही सिडकोकडून नवी मुंबई, पनवेल, उरण नोडमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्याची मोहीम सुरूच आहे. पावसाळ्यात अतिक्रमण विरोधी कारवाई होत नसल्याने याच कालावधीत अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर होतात. परंतु पावसाळ्यातही अतिक्रमणावर सिडकोची हातोडा मोहीम सुरूच असल्याने अतिक्रमणकर्त्यांचे धाबे दणाणले आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी . शिवराज एस. पाटील, सिडको अनधिकृत बांधकाम विभाग यांच्यातर्फे खारघर (तळोजा – नावडे) नोड येथील अनधिकृत बांधकाम हटविण्याची मोहिम राबविण्यात आली. खारघर (तळोजा) सेक्टर 40, भूखंड क्र. 1 येथील 36,485.14 चौ.मी. क्षेत्रफळावरील अनधिकृत चाळीतील 20 खोल्या व पक्का म्हशीचा तबेला निष्कासित करण्यात आला आहे. सदर भूखंड सिडकोच्या सर्वसामान्यांसाठीच्या घरांसाठी राखून ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे तळोजा व नावडेच्या प्रवेशद्वाराजवळील अनधिकृत झोपडपट्टी हटवून अंदाजे 5 एकरचा परिसर रिकामा करण्यात आला आहे.
सदर मोहिम अनधिकृत बांधकाम नियंत्रक (दक्षिण) दिपक जोगी ,सहाय्यक अनधिकृत बांधकाम नियंत्रक(प्रभारी) अमोल देशमुख, सहाय्यक अनधिकृत बांधकाम नियंत्रक एस. आर. राठोड, सहाय्यक अधिकारी आर.एस. चव्हाण व कार्यकारी अभियंता (हाऊसिंग -1) एस. ए. फापुणकर, यांच्या पथकाने सदर निष्कासन कारवाई सुलभरित्या पार पाडली.
तळोजा पोलिस स्थानकातील पोलिस निरिक्षक महेश तरडे व 25 पोलिस कर्मचार्यांच्या यांच्या सहकार्यामुळे अतिक्रमणाची कारवाई यशस्वीरीत्या करण्यात आली. तसेच मोहिमेच्या ठिकाणी सिडकोचे पोलिस कर्मचारी, सिडकोचे सुरक्षा अधिकारी व एमएसएफचे सुरवसे, सहाय्यक सुरक्षा अधिकारी गोसावी व इतर सुरक्षा रक्षक उपस्थित होते. या कारवाईसाठी 1 पोक्लेन, 1 जेसीबी, 1 ट्रक, 4 जीप व 15 कामगार यांची नियुक्ती करण्यात आली होती.