साईनाथ भोईर / नवी मुंबई
आनंद देते तेच करिअर समजून त्यातच मुलांनी रस घेतला पाहिजे. त्याच्यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपले अंगभूत गुण ओळखून त्याच रस्त्याने गेले पाहिजे. आई-वडील, शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करतात, म्हणजेच या रस्त्याने जा असे सांगतात. पण या मार्गावरील खड्डे, काटे, अडथळे आपल्यालाच पार करायचे असतात. हे सर्व करताना त्यातून आपल्याला आनंद मिळत असेल तरच त्या मार्गाने जावे, असे मार्गदर्शन पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे आणि कविवर्य प्रा. अशोक बागवे यांनी आज येथे केले.
कांतीलाल प्रतिष्ठान आणि संघर्ष समितीच्या वतीने पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात दहावी-बारावीतील उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी दै. ‘निर्भीड लेख’चे संपादक व कवी कांतीलाल कडू यांच्या वाढदिवसानिमित्त करिअर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले, त्यावेळी आयुक्त डॉ. शिंदे आणि कविवर्य प्रा. बागवे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मंगेश विश्वासराव, गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे, पंचायत समितीचे अधीक्षक गजानन जाधव, कांतीलाल कडू उपस्थित होते.
आयुक्त डॉ. शिंदे यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, लहानपणी आपण कुठले क्षेत्र निवडावे हे मलाही कळत नव्हते. त्यावेळी आजच्यासारखी करिअर मार्गदर्शन करणारी शिबिरे नव्हती. आठवी, नववी शिकलेल्या माझ्या आईला मी विचारले की, मी डॉक्टर व्हावे की इंजिनिअर? तेव्हा ती म्हणाली, या दोन्ही गोष्टीमध्ये तुला आनंद वाटत असेल तर दोन्ही गोष्टी कर. त्यावेळी मला थोडे आश्चर्य वाटले. त्यातला आनंद हा शब्द माझ्या मनात राहिला. आनंदी असणे ही सर्वांत मोठी गोष्ट असते. या दोन्ही शाखांमध्ये मला रस होता, त्या दोन्ही शाखा मी निवडल्या. मला त्यातून चांगल्या गुणांबरोबरच आनंदही मिळत होता. परंतु पुढे मी स्वतःला अधिक ओळखू लागलो आणि त्यातूनच मी प्रशासकीय क्षेत्राकडे वळलो. महाराष्ट्र सरकारच्या प्रशासनात अनेक महत्वाचे निर्णय उपसचिव पदावर असल्यामुळे मला घेता आले. भारत ही एक महासत्ता व्हायची असेल तर सर्व मुलांनी आपल्यातील आवड ओळखून त्याप्रमाणे क्षेत्र निवडले पाहिजे. प्रत्येक काम महत्वाचे असते. मात्र, आपल्याला ज्या कामाची आवड आहे, जे काम करताना आपण थकत नाही तेच काम करिअर म्हणून निवडावे. शेजारच्या मुलाने निवडलेले क्षेत्र आपणही निवडले पाहिजे असे कधीच नसते. गुरूजन मागदर्शन करत असतात. मात्र, आपण आपल्याला जे काम आनंद देते ते काम करून देशाला मोठे केले पाहिजे. माझा प्रत्येक निर्णय मीच घेतला. तो घेताना मी माझे आरोग्यही जपले. प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी. आरोग्य चांगले असेल तर त्या निरोगी शरीरात ज्ञानाचा साठा चांगला होतो, असे डॉ. शिंदे म्हणाले.
शिक्षणाची फलश्रृती फळांच्या नावानेच सुरू होते. मुळाक्षरे गिरवताना त्यासाठी फळांचेच उदाहरण दिले जाते. आमच्या लहानपणी ‘अ’ म्हणजे अननस असे शिक्षक शिकवत असत. परंतु कधीही कुणी हे फळ आमच्या शाळेत आणून आम्हा विद्यार्थ्यांना दाखविले नव्हते. आज, ही सगळी फळे विद्यार्थ्यांसमोर येतात. आज कृतीपत्रिका आल्या आहेत. स्वतः विचार करण्याची शिक्षण पद्धती आता सुरू होत आहे. व्यक्त होते, तीच व्यक्ती. चांगली व्यक्त होते, ती अभिव्यक्ती. प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात बोलण्याची, प्रश्न विचारण्याची सवय लागली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनात खूप प्रश्न असतात. ते कुणाला विचारावे? असाही प्रश्न त्यांच्या मनात असतो, त्यामुळे दररोज एक तास कोणत्याही विषयाचा न ठेवता फक्त विद्यार्थ्यांशी बोलण्याचा असला पाहिजे. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी एका कवितेत लिहिले आहे की, सांगा कसे जगायचे? कण्हत कण्हत की, गाणं म्हणत? स्वतःच स्वतःचा आरसा व्हायला आपण शिकले पाहिजे. आज डॉ. शिंदे यांच्यासारखे धडाडीचे आयआरएस अधिकारी या समाजात आहेत, हे फार महत्वाचे आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतून आलेले अनेक अधिकारी परप्रांतिय आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राची नसच माहीत नाही. त्यांनी घेतलेले निर्णय या समाजाच्या फायद्याचे ठरण्याऐवजी अनेकदा अडचणीचे ठरतात, असे सांगून प्रा. बागवे म्हणाले की, महाराष्ट्रातील मुलांनीच मोठे होऊन ही प्रशासकीय सेवा सांभाळली पाहिजे.
हल्लीची शिक्षणपद्धती, वर्षभर शिका आणि तीन तासात ओका, अशी आहे. आठवीपासूनच मुलांची आवड लक्षात घेऊन त्यांना ते शिक्षण दिले पाहिजे. स्कील आणि शिल या गोष्टी मुलांना या वयातच कळल्या पाहिजेत. एखादे रोपटे जसे मोठे होते, त्याचा वटवृक्ष होतो, तशीच ही वाढ असते. मुले शाळेत असताना मातीच्या गोळ्यासारखी असतात. पुढे महाविद्यालयात गेल्यावर त्यांचा सिमेंटचा गोळा होतो हे शिक्षकांनी लक्षात घेतले पाहिजे. शिल्पकार मायकेल अँजेलो यांना त्यांच्या शिष्याने विचारले की, इतके हुबेहुब, जिवंत शिल्प आपण कसे घडवता? तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर फार मार्मिक होते. ते म्हणाले की, मी शिल्प घडवत नाही. दगडामधला नको असलेला भाग मी अलगद बाजूला करतो आणि त्याचेच शिल्प होते. शिक्षणपद्धती या प्रकारचीच हवी, असे मत प्रा. बागवे यांनी मांडले.
शिक्षणाच्या सुलभीकरणाबाबत बोलताना प्रा. बागवे म्हणाले, आईच्या भाषेत बोलते तेच खरे शिक्षण असते आणि शिक्षक हा सरस्वतीचा सनदी नोकर असतो.
जगात काही तरी वेगळा विचार करणार्याला लोक आधी हसतात आणि नंतर खरे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याच्या बोलण्यातले इंगित लोकांना कळू लागते. लोकांना आधी वाटत होते की, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. कोपर्निकसने यापेक्षा उलटा सिद्धांत मांडला. तो म्हणाला की, सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरत आहे. त्याच्या या बोलण्याची आधी हेटाळणी झाली. मात्र, नंतर लोकांनीच त्याला डोक्यावर घेतले.