साईनाथ भोईर / नवी मुंबई
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे महाराष्ट्र दौर्यावरून जावून ३६ तासाचा कालावधी उलटला तरी भाजपा कार्यकर्त्यांच्या व पदाधिकार्यांच्या चर्चेमध्ये तसेच सोशल मिडीयामध्ये अमित शहांच्याच भेटीचा विषय चर्चिला जात आहे. अमित शहांचे शाकाहारी जेवण आणि विशेषत: खिचडीच्या प्रेमात मुंबई भाजप पडल्याचे व्हॉट्सअपवरील संभाषणामध्ये पहावयास मिळत आहे.
अमित शहा १६जून ते १८ जुन या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र भेटीवर आले होते. या कालावधीत अमित शहा मुंबई मुक्कामीच होते. पक्ष विस्तारक योजनेचा आढावा, मंत्रिमंडळाच्या कामकाजाची तपासणी, मंत्री-आमदार, पक्षीय पदाधिकार्यांशी सुसंवाद या माध्यमातून अमित शहा यांनी मध्यावधी निवडणूकीच्या शक्यतेने पक्षसंघटनेची चाचपणी केली आणि राष्ट्रपती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मित्र पक्षांच्या मानसिकतेचाही अंदाज अमित शहांनी घेतला.
या सर्व घडामोडीत तीन दिवसाच्या कालावधीत अमित शहांचा आहार केवळ खिचडी आणि दही असाच राहीला होता. सह्याद्रीवरील कार्यक्रमात त्यांनी एक-दोन वेळा भेळही खाल्ली. इतका आक्रमक नेत्याचा आहार किती साधा आहे, याचीच चर्चा भाजपाच्या सोशल मिडीयावर सुरु आहे. ‘देखो शाकाहारी का बल- अमितजी खिला रहे है हर जगह कमल’ असे स्लोगनही काही उत्साही पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सोशल मिडीयावर फिरविले जात आहे. सध्या मुंबईतील भाजपा आमदार व पक्षीय पदाधिकारी तसेच कार्यकर्ते अमित शहाच्या शाकाहारी जेवणाच्या विशेषत: खिचडी आणि दहीच्या पे्रमात पडल्याचे पहावयास मिळत आहे.