नवी मुंबई : प्रशासकीय कामकाजात अनियमितता करून प्रशासन विभागाच्या उपायुक्तांनी अतिक्रमण विभागाचे प्रभारी उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त पदाची जबाबदारी सोपविलेले वैद्यकिय अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांनी अतिक्रमण विभागात घेतलेले बेकायदेशीर निर्णय आणि गैरव्यवहाराची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडे केली आहे. त्यामुळे डॉ. गायकवाड यांच्या कारकिर्दीत अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर प्रशासन विभागातील नियमबाह्य काम आणि अधिकार्यांचा मनमानीपणा उघडकीस आला आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या आस्थापनेत असलेले वैद्यकीय अधिकारी, कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यातील इच्छुक अधिकार्यांकडून विभाग अधिकारी या पदासाठी तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीसाठी ऑगस्ट 2016 मध्ये अर्ज मागविले होते. त्यावेळी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांनी विभाग अधिकारी पदावर तात्पुरत्या नेमणुकीकरीता अर्ज सादर केला नसताना देखील गायकवाड यांना सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण) या पदाचा कार्यभार देण्यात आला. सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त पदासाठी अर्ज मागविलेले नसतांना प्रशासकीय कामकाजात अनियमितता करून डॉ. कैलास गायकवाड यांच्याकडे बेकायदेशीररित्या प्रशासन विभागाने प्रभारी सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त पदाची जबाबदारी दिल्याचा गंभीर आरोप नामदेव भगत यांनी केला आहे.
कैलास गायकवाड यांनी अतिक्रमण विभागाची जबाबदारी सांभाळताना सुमारे 500 हुन अधिक बांधकामांना नोटीस बजाविल्या आहेत. यापैकी सुमारे 400 हुन अधिक नोटिसांना जून 2016 ते मार्च 2017 दरम्यान न्यायालयाने स्थगिती आदेश दिले आहेत. याचे कारण म्हणजे जागेची पाहणी न करता किंवा कायदेशीर बाबी न तपासता संबंधितांना नोटिसा बजावण्यात येत असल्याने महापालिकेने बजावलेल्या नोटिसांना न्यायालय स्थगिती देत असल्याची माहिती महापालिकेचे तत्कालीन वकील अॅड. बिराजदार यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
तसेच आरोग्य विभागात पीसीपीएनडीटी संदर्भातील कामकाज पाहतांना डॉ. कैलास गायकवाड यांनी 15 हजार रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. त्याबाबत प्रशासनानेही त्यांना नोटिस बजावून खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. अतिक्रमण आणि आरोग्य विभागातील कैलास गायकवाड यांच्या वादग्रस्त कारकिर्दीबाबत नागरिकांच्या तक्रारी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे प्राप्त झाल्याने त्यांनी कैलास गायकवाड यांची सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त अतिक्रमण या पदावरून तत्काळ उचालबांगडी करून त्यांना त्यांच्या मुळ वैद्यकीय अधिकारी पदावर नेमणूक केली. त्यामुळे डॉ. कैलास गायकवाड यांनी अतिक्रमण विभागात केलेल्या बेकायदेशीर कामकाज आणि गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांची अन्य कोणत्याही पदावर नेमणूक करू नये, अशी मागणी नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडे केली आहे.