राष्ट्रवादी काँग्रेसचा ढाण्या वाघ हांडेपाटील यांनी फोडली वाचा
गणेश इंगवले / नवी मुंबई
स्वमालकीचे मोरबे धरण असतानाही नवी मुंबई कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे परिसरातील रहीवाशांना सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कोपरखैराणेवासी पाण्यासाठी एकीकडे व्याकुळ असताना दुसरीकडे रिलायन्सच्या वसाहतीला थेट जलवाहिनीतून पालिका प्रशासन मुबलक पाणीपुरवठा करत असल्याच्या संतापजनक प्रकाराला राष्ट्रवादी काँग्रेसचे ढाण्या वाघ असणार्या नगरसेवक देविदास हांडेपाटील यांनी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत वाचा फोडली.
देविदास हांडेपाटील हे स्थायी समितीत आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची खर्या अर्थांने धार चढली आहे. महापालिका प्रशासन मुख्य जलवाहिनीतून कोणत्याही नवी मुंबईकराला थेट पाणी देत नाही. कोपरखैराणेवासियांनाही जलकुंभातूनच पाणीपुरवठा होतो. मात्र महापालिका प्रशासन कोपरखैरणेतील रिलायन्सच्या वसाहतीला आणि शाळेला थेट जलवाहिनीतून पाणी उपलब्ध करून देत असल्याचा घणाघाती हल्ला राष्ट्रवादी काँग्र्रेसचे नगरसेवक देविदास हांडेपाटील यांनी प्रशासनावर चढविला.
एकीकडे कोपरखैरणेवासीय पाण्यासाठी व्याकुळ झालाय, पाण्यासाठी मरतोय आणि दुसरीकडे रिलायन्सच्या वसाहतीला व शाळेला मुबलक पाणी मिळत आहे. हा कोणता सामाजिक न्याय असल्याचा संतप्त सवाल हांडेपाटील यांनी यावेळी प्रशासनाला विचारला.
कोपरखैराणेतील पाणीटंचाईबाबत सभागृहात सर्व स्थानिक नगरसेवक बोंबा मारतात, पण प्रशासनाला काहीही फरक पडत नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेवून चौकशी झालीच पाहिजे आणि रिलायन्सलाही इतरांप्रमाणेच जलकुंभातून पाणीपुरवठा करण्याची मागणी देविदास हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली.
शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनीही या विषयावर बोलताना राजाला एक न्याय आणि प्रजेला एक न्याय ही महापालिकेची भूमिका चुकीची असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली.
महापालिकेचे शहर अभियंता यांनी या प्रकारावर सारवासारव करताना या प्रकाराची व जोडणीची चौकशी करण्याचे सभागृहाला आश्वासन दिले. हांडेपाटील स्थायी समिती सभागृहात आल्यापासून कोपरखैराणे नोडला खर्या अर्थांने न्याय मिळाला असल्याची भावना सर्वसामान्य कोपरखैराणेवासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे.