गणेश इंगवले / नवी मुंबई
मुंबई : एसआरए योजनेमुळे नवी मुंबई, पनवेलमध्ये झोपड्या अधिक प्रमाणावर वाढण्याची शक्यता लक्षात घेवून गृहनिर्माण विभागाकडून या ठिकाणी एसआरए योजना राबविण्यास नकार दिला असल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील मंत्रालयीन सूत्रांनी दिली.
सध्या नवी मुंबई, पनवेल परिसरात एसआरए योजना राबविणार येणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. नवी मुंबई व पनवेलमधील झोपडपट्टी परिसरात एसआरए योजना येण्याच्या शक्यतेनेच झोपड्यांच्या तसेच स्लम विभागातील चाळीतील घरांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. एसआरए योजना मुंबईत राबविताना आलेल्या अनुभवामुळेच नवी मुंबई आणि पनवेलमध्ये एसआरए योजना न राबविण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरातील झोपड्यांचा बकालपणा संपुष्ठात येवून सुनियोजित स्वरूपात ईमारती उभ्या राहाव्यात यासाठी एसआरए प्रयत्न करते. मुंबईत १९९५ साली झोपड्यांच्या पुर्नविकासासाठी एसआरए योजना राबविण्यास सुरूवात झाली. ४० लाख झोपडपट्टीवासियांना मोफत घरे या योजनेची अंमलबजावणीही एसआरएच्याच माध्यमातून झाली. परंतु एसआरएने प्रकल्प सुुरू केल्यावर मुंबईत झोपडपट्टी कमी होण्याऐवजी कैकपटीने वाढली असल्याचे गृहनिर्माण विभागाचे म्हणणे आहे.
पनवेलमध्ये एसआरए योजना लागू करावी यासाठी पनवेलचे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर गेल्या काही वर्षापासून प्रयत्नशील आहेत. नवी मुंबईतही या योजनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपाकडून सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र संबंधितांना नवी मुंबई आणि पनवेलमध्ये एसआरए योजना राबविली जाणार नसल्याचे गृहनिर्माण विभागाने स्पष्ट केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.