गणेश इंगवले / नवी मुंबई
सध्या मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पनवेल-उरण, कल्याण-डोंबिवली, भाईदर भागात तीन दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. मात्र याच पावसाचा फायदा उचलत परिसरातील कार्यकर्त्यांकडून नगरसेवकांकडे पावसाळी सहलीची आणि ओल्या पार्टीची मागणी केली जात आहे. आधीच निवडणूकीच्या खर्चामुळे त्रस्त झालेले मुंबई-ठाण्यातील नगरसेवक कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीमुळे पावसातही गारठलेले पहावयास मिळत आहे.
मुंबई-ठाणे महापालिकेच्या निवडणूका नुकत्याच झाल्या आहेत.त्यामुळे निवडणूकीत आपल्या उमेदवारांसाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले असल्यामुळे कार्यकर्त्यांना नकार देणे नगरसेवकांना शक्य नाही. तीच अवस्था निवडणूकीत पडलेल्या मातब्बर पराभूत उमेदवारांचीही झालेली आहे. निवडणूकीत लाखोंचा खर्च निवडून आलेल्या व पराभूत झालेल्या ठाणे-मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील उमेदवारांचा झालेला आहे. निवडणूकीत उसने घेतलेल्या पैशाचीही उमेदवारांकडून अद्यापि परतफेड झालेली नाही. त्यातच प्रभागातील कार्यकर्त्यांच्या पावसाळी सहलीचा व ओल्या पार्टीचा खर्च हा काही लाखापर्यतही जात असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.
मुंबई-ठाण्यातील निवडणूका आता झाल्या आहेत, नवी मुंबई महापालिका निवडणूकांना अद्यापि पावणे तीन वर्षाचा विलंब आहे, तरीही नवी मुंबईतील नगरसेवक व निवडणूक लढवू पाहणारे इच्छूक कार्यकर्त्यापासून तोंड लपवू लागले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणूका पॅनल पध्दतीने होणार आहेत. चार प्रभागातून मतदान घ्यावे लागणार आहे. त्यामुळे नगरसेवकांकडे स्वत:च्या प्रभागासोबत बाजूच्या प्रभागातील मातब्बर कार्यकर्त्यांकडून सहलीची व ओल्या पार्टीची मागणी होवू लागली आहे. एकीकडे पुरूष कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील नगरसेवक त्रस्त झाले असतानाच त्यात आता महिला कार्यकर्त्यांचीही भर पडली आहे. आपल्या महिला बचत गटालाही धार्मिक सहलीला पावसाळ्यात विशेषत: श्रावण महिन्यात घेवून जाण्याची मागणी होवू लागली आहे. हा पावसाळा आपल्याला किमान 3 ते 5 लाख रूपयांना खड्ड्यात घालणार असल्याचे नगरसेवक आपसात बोलू लागले आहेत.
ज्या नगरसेवकांचे कर्जत, पनवेल, उरण, खोपोली भागात फार्म हाऊस आहेत, त्यांना तुलनेने कमी खर्च होणार असला तरी ज्यांच्याकडे फार्म हाऊस नाहीत त्यांना मात्र भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे संततधार पाऊस सुरू असतानाही नगरसेवक सहलीच्या आर्थिक तणावाखाली वावरत असल्याचे मुंबई महापालिका मुख्यालय आवारात पहावयास मिळाले.