गणेश इंगवले / नवी मुंबई
शेतकर्यांच्या कर्जमाफी प्रकरणाने राज्य सरकार कोंडीत सापडलेले असतानाच मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, उरण, भाईदर आदी भागातील कोळी लोकांनीही राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्याची तयारी सुरु केली आहे.वर्षानुवर्षे कोळी समाजाची उपेक्षाच होत असल्याने आता अखेरची निर्णायक लढाई लढण्याची भाषा कोळी समाजाच्या युवा पिढीकडून बोलली जात आहे.
मुंबई शहर, उपनगर, ठाणे-भाईदर, नवी मुंबई-पनवेल-उरण भागात नागरीकरण झाले असले तरी त्या त्या भागात असणारे कोळीवाडे आजही कोळी समाजाचे अस्तित्व दाखवून देत आहे. सागरात, खाडीमध्ये होत असलेल्या विकासकामांमुळेम, अतिक्रमणामुळे मासे कमी होत असल्याने कोळी लोकांच्या अस्तित्वावर आणि उपजिविकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे. मुंबईतील सागरात शिवस्मारकावरून मासेमारीवर परिणाम होणार असल्याने येथील कोळी संघटीत होवून लढा देत आहेत. भाईदर-ठाणे, नवी मुंबई-पनवेल-उरण भागात वाढत्या विकसिकरणामुळे तेथील खाड्या दूषित झाल्या आहेत. त्यातच खाड्यामध्ये उभारल्या जाणार्या पुलामुळे, खाडीकिनार्यालगतच्या रस्त्यामुळे खाडीतील मासेमारी संपुष्ठात आली असल्याचे कोळी समाजाकडून सांगण्यात येत आहे.
नवी मुंबईत उभारल्या गेलेल्या खाडीपुलामुळे, रेल्वे पुलामुळे, पामबीच मार्गामुळे तसेच कंपनी-कारखान्यातील रासायनिक प्रदूषित पाण्यामुळे येथील मासेमारीवर ८० टक्के परिणाम झाला आहे. भाईदर भागातही खाडीत रेल्वे पुल व अन्य वाहतुकीचे पुल बांधल्याने कोळी लोकांच्या नव्या पिेढीला आता नाक्यावर रोजगार शोधण्याची वेळ आली आहे.
पनवेल परिसरात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळेही तेथील कोळी लोकांसमोर उपजिविकेचे संकट निर्माण झाले आहे. या विमानतळासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनामुळे गाढी नदीचे पात्र वळविण्यात आले आहे. तेथील नदी व खाडीअर्ंतगत परिसरात भराव टाकण्याचे काम सुरु आहे. उरण परिसरातील औद्योगिकरणामुळे तेथील खाडीत रासायनिक व केमिकलयुक्त पाण्यामुळे मासेमारीला घरघर लागली आहे.
मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, उरण, भाईदर आदी भागातील कोळी लोकांनीही आजवर आपल्या पध्दतीने लढा दिल्यामुळे हा लढा व्यापक झाला नाही व राज्य सरकारनेही या लढ्याची दखल घेतली नाही. नियोजित शिवडी-उरण पुलामुळे उरण आणि नवी मुंबईतील मासेमारी कायमचीच संपुष्ठात येणार आहे. त्यामुळे आता सर्वच भागातील कोळी समाज एकत्रित येवून राज्य सरकारच्या विरोधात लढ्याची तयारी करत आहे. सोशल मिडीयावर व्हॉट्सअप व फेसबुक तसेच मोबाईलवरून हा समाज एकत्रित येवू लागला आहे. कोळी समाजातील घटक आजवर नगरसेवक, आमदार व सिडको संचालकही झाले, पण त्यांनी समाजबांधवांच्या समस्या सोडविण्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप कोळी समाजातील युवा पिढीकडून करण्यात येत आहे. केवळ आगरी-कोळी भवन आणि कार्ला येथील एकवीरा आईचे मंदिराचा अपवाद वगळता कोळी समाजातील राजकारण्यांनी काहीही विशेष न केल्याने आज कोळी समाजावर उपासमारीची वेळ आली असल्याचा संताप कोळी समाजाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, उरण, भाईदर आदी भागातील कोळी समाजाची लोकसंख्या १५ लाखापेक्षा अधिक असतानाही एकत्र लढा न दिल्याने समस्या सुटल्या नाहीत. याप्रकरणी गावागावात पत्रके वाटून लढ्याची जनजागृती करण्यात येत आहे. लवकरच आझाद मैदानावर एकत्रितपणे निदर्शने करून राज्य सरकारविरोधात आपल्या मागण्यांसाठी लढा व्यापक करण्यात येणार असल्याची माहिती कोळी संघटनांकडून देण्यात येत आहे.