गणेश इंगवले / नवी मुंबई
चार-पाच दिवसापासून सुरु झालेल्या पाऊसाने मुंबईकर भिजून निघाले आहेत. पाऊसामुळे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण, आंदोलन व निदर्शन करणार्या लोकांची तारांबळ उडाली आहे. पाऊसातही आंदोलन सुरू ठेवण्यासाठी त्यांना बांबू, ताडपत्री व प्लॉस्टिकच्या कागदासाठी शोधाशोध करावी लागली आहे. त्यामुळे आपल्या आंदोलनाकडे ‘सरकार लक्ष देईना आणि पाऊसही राहू देईना’ अशी अवस्था आंदोलनकर्त्यांची झाली आहे.
आझाद मैदानावर गेल्या काही महिन्यापासून परेल येथील बोगदा चाळीतील रहीवाशी आंदोलन करत आहे. खोपोली येथील झेनिथ बिर्ला लि.चे कामगार हिंद कामगार संघटनेच्या माध्यमातून व्यवस्थापणाच्या विरोधात बेमुदत आंदोलन करत आहे. सॅनिटरी नॅपकिन जीएसटीतून मुक्त करण्यासाठी लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यामधील महिला व युवतीही आंदोलन करत आहेत. याशिवाय तीन ते चार अन्य घटकही आंदोलन करत आहेत. हे आंदोलनकर्ते गेल्या काही महिन्यापासून आझाद मैदानावर उपोषण, निदर्शन व आंदोलन करत असतानाही राज्य सरकारकडून यांची दखल घेण्यात आलेली नाही. त्यातच आता पाऊस सुरू झाल्याने आंदोलनकर्त्यांची ताराबंळ उडाली आहे.
पाऊसाचे पाणी खड्ड्यात साचू लागल्याने साथीच्या आजाराचे संकट आंदोलनकर्त्यांपुढे निर्माण झाले आहे. अधूनमधून साप-नागाचे दर्शनही या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना होत आहे. मराठा मोर्चा, शेतकरी आंदोलन व अन्य महत्वाचे मोर्चे असले तरच प्रसिध्दी माध्यमांचे लक्ष आझाद मैदानाकडे येते. आमच्याकडे मात्र राज्य सरकारसहसह सर्वाचाच कानाडोळा असल्याची खंत या आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. पोलिस मात्र आपली आर्वजून चौकशी करत असल्याचा दिलासा मिळत असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगितले जात आहे.