साईनाथ भोईर : नवी मुंबई
इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र हा लोककल्याणकारी उपक्रम देशापरदेशात नावाजला जात असून विद्यार्थी पालकांना सर्वार्थाने दिलासा देणारा आहे. या केंद्राच्या दशक वर्षपूर्तीनिमित्त मागील दहा वर्षांच्या वाटचालीकडे बघताना या उपक्रमाचा एक भाग म्हणून समाधान वाटते अशा शब्दात नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या इ.टी.सी. अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राच्या दहाव्या वर्धापनदिन समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी व्यासपिठावर महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण, शहर अभियंता मोहन डगांवकर, उप आयुक्त श्रीम. तृप्ती सांडभोर, इ.टी.सी. केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी इ.टी.सी. हा दिव्यांगांसाठीचा कल्याणकारी उपक्रम महानगरपालिका सामाजिक जबाबदारी म्हणून राबवित असल्याचे सांगत, यामुळे विशेष मुलांनां व त्यांच्या पालकांना मिळणारा लाभ बघता यामध्ये अधिक वाढ कशी होईल याकडे विशेष लक्ष देण्यात येईल असे सांगितले. स्पर्धा परीक्षांमध्ये नवी मुंबईतील विद्यार्थी गुणवत्त यादीत यावेत याकरीता कायमस्वरुपी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात येईल अशी संकल्पना त्यांनी मांडली.
यावेळी दहा वर्षापूर्वी सन 2007 मध्ये इ.टी.सी. केंद्रात शिक्षण प्रशिक्षण घेत असलेल्या त्यावेळेच्या विद्यार्थ्यांचा तसेच तेव्हापासून इ.टी.सी. केंद्रात कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला. आपल्या शारीरिक कमतरतेवर मात करीत विशेष विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतनृत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांना मान्यवरांसह उपस्थितांनी कौतुकाची दाद दिली.
इ.टी.सी. केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातील दहा वर्षाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला.
यावेळी महापौर महोदयांच्या शुभहस्ते फाईल मेकींग व पिनींग मशिनचे उद्घाटन संपन्न झाले. याव्दारे व्यावसाय प्रशिक्षणाचे व फाईल निर्मितीचे नवे दालन या विशेष विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहे. त्याचप्रमाणे आयुक्त महोदयांच्या हस्ते सी.एस.आर. कक्षांतर्गत सर्टिफिकेशन इंजिनियर्स इंटरनॅशनल लि. यांच्या विद्यमाने इ.टी.सी. केंद्रामध्ये दिव्यांग मुले व व्यक्तींच्या सुलभ चलनवलनाकरीता अत्याधुनिक स्वरुपाची चलनवलन साधणे व उपचार साहित्य हस्तांतरण करण्यात आले. याव्दारे इ.टी.सी. केंद्रातील दिव्यांगांचे शिक्षण व उपचार प्रक्रियेत परिणामकारक वापर करणे सुलभ होणार असून दिव्यांगांमध्ये स्वावलंबन व आत्मविश्वास जागरुतीसाठी मदत होणार आहे. सर्टिफिकेशन इंजिनियर्स इंटरनॅशनल लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.डी.खेर्डेकर व सहा. व्यवस्थापक जी.डी.गोस्वामी हे देखील या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.
रबाळे येथील छोट्या जागेतून वाशी येथील मोठ्या जागेत एकाच छताखाली विविध प्रकारच्या दिव्यांगांना शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा पुरविणा-या इ.टी.सी. केंद्राची दहा वर्षांची वाटचाल ही नवी मुंबई महानगरपालिकेचा लोकाभिमूख भूमिका दृढ करणारी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.