सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेकडील रहीवाशांना रिंगरूट बससेवेची नितांत गरज आहे. या बससेवेसाठी आम्ही गेली काही वर्षे सातत्याने नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाकडे लेखी व तोंडी पाठपुरावा करत आहोत. राजकीय घटकांनी श्रेय मिळविण्यासाठी या बससेवेच्या शुभारंभाच्या कामामध्ये राजकीय दबाव आणून अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला श्रेय नको तर जनतेला सुविधा द्याव्यात अशी मागणी शिवसेनेच्या नेरूळ पश्चिममधील प्रभाग 87च्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी परिवहन व्यवस्थापकांकडे शनिवारी (दि. 1 जुलै) रोजी एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ पश्चिमेकडील वाढत्या नागरीकरणाला बससेवेची सुविधा नितांत गरज लक्षात घेता रिंगरूट बससेवेविषयी मागील सभागृहात या विभागाचे तत्कालीन नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी पाठपुरावा केला होता. या सभागृहात आल्यानंतर आपणही रिंगरूट बससेवेविषयी परिवहन उपक्रमाकडे लेखी व तोंडी पाठपुरावा केला असल्याचे नगरसेविका सुनिता मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
1 जुलै रोजी सकाळी 10 वाजता नेरूळ पश्चिम परिसरात रिंगरूट परिसरात बससेवेचा शुभारंभ होणार होता. परिवहन उपक्रमाने या बसेसेवेचा शुभारंभ नेरूळ सेक्टर 8 मधील एल मार्केट परिसरात होणार होता. याबाबत नगरसेविका मांडवे यांनी बॅनर लावून तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृतीही केली होती. तथापि या रिंगरूट बससेवेचे श्रेय मांडवे दांपत्याला जात असल्याचे पाहून आदल्या दिवशी काही प्रस्थापित राजकीय घटकांनी बससेवेचा शुभारंभ पुढे ढकलण्यासाठी आपली राजकीय शक्ती पणाला लावली. या गोष्टींचा निवेदनात उल्लेख करत रिंगरूट बससेवेचा शुभारंभासाठी सकारात्मक प्रतिसाद देणार्या परिवहन उपक्रमाचे आभार मानले आहेत.
रिंगरूट बससेवा लवकरात लवकर सुरू करा, श्रेय कोणाला घ्यायचे त्यांना घेवू द्या, उद्घाटन कोणाला करायचे असेल तर करू द्या, आम्हा शिवसैनिकांना समाजकारणाची आवड आहे. नागरी हिताकरिता आम्ही विकासकामांचा पाठपुरावा करणार. आम्हाला श्रेय नको तर जनतेच्या चेहर्याव हास्य पाहायचे आहे. आम्ही कामे करतो आणि आमच्या कामात अडथळे कोण आणतो हे नेरूळवासियांना पुन्हा एकवार जवळून पहावयास मिळाले असल्याची संतप्त प्रतिक्रिया नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.