सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने वन विभागाच्या पुढाकारातून वनमहोत्सव साजरा करीत संपूर्ण राज्यभरात 4 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फतही 40 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प नजरेसमोर ठेवण्यात आला असून आजच्या वनमहोत्सवाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयासमोरील पामबीच मार्गाच्या एन.आर.आय. कॉलनीकडील सर्व्हिस रोडवर महापौर श्री. सुधाकर सोनवणे, उप महापौर श्री. अविनाश लाड, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती श्रीम. शुभांगी पाटील यांच्या शुभहस्ते राज्य पुष्प म्हणून मान्यता प्राप्त अशा ताम्हण वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण व श्री. रमेश चव्हाण, नगरसेवक श्री. रविंद्र इथापे, सौ. हेमांगी सोनावणे, स्थानिक नगरसेवक श्री. दिपक पवार, प्रशासन विभागाचे उप आयुक्त डॉ. सुहास शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, घनकचरा व्यवस्थापन व उद्यान विभागाचे उप आयुक्त श्री. तुषार पवार, समाजविकास विभागाच्या उप आयुक्त श्रीम. तृप्ती सांडभोर, इ.टी.सी. केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, शिक्षणाधिकारी श्री. संदीप संगवे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक परोपकारी आणि इतर अधिकारी-कर्मचारी यांच्या हस्तेही वृक्षारोपण संपन्न झाले.
आजच्या वनमहोत्सवाच्या आरंभदिनी महापालिका क्षेत्रात विविध विभागांमध्ये योग्य जागा निवडून त्याठिकाणी 5500 हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. मिनी सी शोअर वाशी येथे उपमहापौर श्री. अविनाश लाड यांनी वाशी पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी व नागरिकांसह वृक्षारोपण केले. सेक्टर 10 ऐरोली येथे विरोधी पक्षनेते श्री. विजय चौगुले, जी प्रभाग समिती अध्यक्ष श्री. संजू वाडे, स्विकृत नगरसेवक श्री. मनोज हळदणकर त्याचप्रमाणे नेरूळ विभागात रेल्वे स्टेशन भागात नगरसेवक श्री. नामदेव भगत, आर.आर.पाटील उद्यानात नगरसेवक श्री. रविंद्र इथापे, छत्रपती शाहू महाराज उद्यानात नगरसेविका सौ. सुनिता मांडवे, गावदेवी मैदानात नगरसेवक श्री. गिरीश म्हात्रे, सेंट ऑगस्टिन स्कुल मैदानात नगरसेविका श्रीम. मिरा पाटील, सेक्टर 3 बसडेपो येथे नगरसेविका श्रीम. शिल्पा कांबळी, मोराज गार्डनच्या बाजूला नगरसेविका सौ. वैजयंती भगत, नाना नानी पार्क सानपाडा येथे नगरसेविका श्रीम. ऋचा पाटील, गावदेवी मैदान बेलापूर येथे नगरसेवक श्री.अशोक गुरखे आदी लोकप्रतिनिधींसह नागरिकांच्या हस्ते मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण संपन्न झाले. इतरही विभागांमध्येही वृक्षारोपण कार्यक्रमात शालेय विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी नागरिक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
दिनांक 1 जुलै ते 7 जुलै 2017 या कालावधीत राज्यशासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, संवर्धन करून वनमहोत्सव साजरा करण्यात येत असून विविध ठिकाणी वृक्षारोपण व संवर्धनाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये यामध्ये ताम्हण, कांचन, व़ड, पिंपळ, उंबर, कडुनिंब, काजू, बदाम, गुलमोहर, बहावा अशा विविध वृक्षरोपांचा समावेश होता.