सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई, दि.1 : राज्य शासनाने काम करतांना ‘जल, जमीन आणि जंगल’ यांच्या संवर्धनावर भर दिला आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवून पाणलोट क्षेत्राचे पुनरुज्जीवन करणे, 50 कोटी वृक्ष लागवड करुन सध्या 21 टक्क्यांवर असलेले वृक्षाच्छादन 33 टक्क्यांवर नेणे तसेच ‘गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार’ हे अभियान राबवून वाहून जाणारी माती अडविणे या तीन प्रमुख योजनांवर शासन काम करीत आहे. ज्यामुळे आपण आपल्या नैसर्गिक स्त्रोतांचे पुनरुज्जीवन करु शकू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
ऐरोली येथे अनुलोम संस्थेच्या राज्यस्तरीय अनुलोम संगम कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या जनसेवकांशी श्री. फडणवीस यांनी आज संवाद साधला. ऐरोली सेक्टर 17 मधील महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात अनुलोम जनसेवकांचे दोन दिवसीय प्रशिक्षण सुरु आहे. यावेळी अनुलोमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल वझे, मुख्य माहिती अधिकारी स्वानंद ओक, विजय पुराणिक तसेच कोकण विभागीय आयुक्त जगदिश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक प्रशासन अजय अंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. फडणवीस यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जनसेवकांचा सत्कार करण्यात आला. अनुलोम तर्फे तयार करण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांच्या माहिती पुस्तिकेचे व लाभार्थी आभार पत्र स्टिकरचे विमोचनही करण्यात आले.
यावेळी बोलतांना श्री. फडणवीस म्हणाले की, शासन जनतेसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविते परंतू त्या योजना जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या व्यवस्थेतील दोष दूर करुन ती अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत नेण्यासाठी अनुलोम सारख्या कार्य करणाऱ्या संघटनेचे महत्व मोठे आहे. सकारात्मक विचारांनी शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणारी अनुलोम ही देशातील एकमेव संस्था आहे. अराजकीय विचारांनी हे काम सेवा भावनेने करणे हे महत्त्वाचे आहे. यामध्ये कार्यकर्त्यांची भूमिका अदृश्य असूनही महत्त्वाची असते. म्हणूनच अनुलोमच्या जनसेवकांनी शासन आणि जनता यांच्यातील दुवा व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कोणतेही काम करतांना त्या कामामागील प्रेरणा काय आहे हे ओळखणे महत्त्वाचे आहे. शासकीय योजना राबविणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये ही प्रेरणा महत्त्वाचे काम करते. कुणाच्याही जीवनात सकारात्मक परिवर्तन करणे हीप्रेरणा असेल तर ते अधिकारी उत्तम काम करतात. त्यामुळे ही प्रेरणा निर्माण करण्यातली दरी भरुन काढण्याचे काम अनुलोम मार्फत व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सामाजिक बांधिलकीची प्रेरणा हीच सकारात्मक परिवर्तन घडवू शकते. यासाठी त्यांनी गॅस सबसिडी सोडण्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी जनतेला केलेल्या आवाहनाचा दाखला दिला. त्यामुळे सबसिडी सोडणाऱ्या वर्गाला प्रेरणा मिळाली आणि अनेकांना गॅस कनेक्शनही मिळाले. क्षेत्र कोणतेही असो तेथे काम करणारा कार्यकर्ता हा ‘लीडर’ असतो. अशा सेवाभावी क्षेत्रात काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आज आहे. काम केल्यानंतर कामाबद्दल होणाऱ्या प्रशंसेने अहंकाराचा लवलेषही होऊ देऊ नका, अशी सूचनाही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केली.
राज्यात नुकत्याच जाहीर झालेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत बोलतांना ते म्हणाले की, ही योजना आखतांना शेतकऱ्यालाच त्याचा फायदा व्हावा, असेच शासनाचे धोरण आहे. अनुलोमच्या कार्यकर्त्यांनी या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्या, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वानंद ओक यांनी केले. यावेळी राज्यभरातील अनुलोम जनसेवक उपस्थित होते.