नवी मुंबई / प्रतिनिधी
जुईनगर सेक्टर 24 परिसरात स्मशानभूमीलगत ट्री-बेल्टसाठी व उद्यानासाठी भुखंड राखीव आहेत.या ट्री-बेल्टसाठी राखीव असलेल्या भुखंडावर वृक्षारोपण करण्याची तसेच उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर उद्यान विकसित करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व नवी मुंबई काँग्रेसचे रोजगार व स्वंयरोजगार विभागाचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
ट्री बेल्टसाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर वृक्षारोपण व उद्यानासाठी आरक्षित भुखंडावर उद्यान विकसित करण्यासाठी रवींद्र सावंत पालिका प्रशासनाकडे गेल्या काही वर्षापासून सतत पाठपुरावा करत आहेत.
मंगळवारी पालिका आयुक्तांना दिलेल्या लेखी निवेदनात रवींद्र सावंत पुढे म्हणाले की, सध्या पावसाळ्याचे दिवस असून सर्वत्र वृक्षारोपण होत आहे. जुईनगरवासियांकरिता स्मशानभूमीलगत ट्री बेल्ट आणि उद्यान यासाठी दोन स्वतंत्र भुखंड राखीव आहेत. पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाला प्राधान्य देत असताना नवी मुंबई महापालिका प्रशासन मात्र ट्री-बेल्टसाठी आरक्षित भुखंडावर वर्षानुवर्षे स्थानिकांकडून मागणी करूनही वृक्षारोपण करत नाही. उद्यानासाठी आरक्षित भुखंडावर उद्यान निर्मिती करत नाही. आजही हे भुखंड अविकसित आहेत. राज्य सरकारच्या पर्यावरणपोषक धोरणाला महापालिकेकडून हरताळ फासला जात असल्याचा आरोप रवींद्र सावंत यांनी केला आहे.
या भुखंडावर डेब्रिज पडले असून हे भुखंड आजही अविकसित अवस्थेत आहेत. सध्या पावसाळा सुरू असून या अविकसित भुखंडामुळे परिसरात डासांचा उद्रेक वाढीस लागला आहे. ट्र्र-बेल्ट आणि उद्यानासाठीच्या भुखंडाबाबत पालिका प्रशासन स्थानिक रहीवाशांना साथीच्या आजाराकडे ढकलत असल्याची नाराजी रवींंद्र सावंत यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
या भुखंडावर पालिका प्रशासनाने वृक्षारोपण करावे अन्यथा आम्हाला परवानगी दिल्यास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ट्री बेल्टच्या जागेवर वृक्षारोपण व संवर्धन करण्याची तयारी रवींद्र सावंत यांनी दर्शविली आहे.
उद्यानासाठी व ट्री बेल्टसाठी आरक्षित असलेल्या भुखंडाची पालिका आयुक्तांनी पाहणी केल्यास त्यांना मागणीतील सत्यता व समस्येतील गांभीर्य समजून येईल असेही सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.