नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता असून त्यांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या आंतरक्रीडा संकुलांच्या माध्यमातून मुलांच्या क्रीडागुण विकासासाठी एक चांगली सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांनी नवी मुंबई हे आपले आधुनिक शहर असून यापुढील काळात शहरातील मैदाने विकसित करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून तिन्ही ऋतूंमध्ये वापरता येतील अशा स्वरूपात विकसित करावीत अशी सूचना केली. सेक्टर 25, जुईनगर येथील गणेश मैदानात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या आंतरक्रीडा संकुल इमारत उद्घाटनप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांचेसमवेत स्थायी समिती सभापती श्रीम. शुभांगी पाटील, ब प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. रूपाली किस्मत भगत, उद्यान व शहर सुशोभिकरण समिती सभापती श्रीम. तनुजा मढवी, नगरसेवक श्री. रंगनाथ औटी व डॉ. जयाजी नाथ, स्थानिक नगरसेवक श्री. विशाल ससाणे, माजी नगरसेवक श्री. दिलीप घोडेकर, श्री. विजय माने, श्रीम. रोहिणी भोईर, सहा. आयुक्त श्री.चंद्रकांत तायडे, कार्यकारी अभियंता श्री. सुभाष सोनवणे तसेच श्री. मनोहर गायखे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना नगरसेवक श्री. रंगनाथ औटी यांनी आंतरक्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची माहिती देत आज आषाढी एकादशीच्या शुभदिनी नागरिकांना एक चांगली सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे केलेल्या कामाचे सार्थक झाल्याची भावना व्यक्त केली. स्थानिक नगरसेवक श्री. विशाल ससाणे यांनी आभार प्रदर्शन केले.
सेक्टर 25 जुईनगर येथील 4319 चौ.मी. क्षेत्रफळाच्या गणेश मैदानात 43.164 चौ.मी. क्षेत्रात 56 लक्ष खर्च करून एक मजली आंतरक्रीडा संकुल इमारत उभारण्यात आली असून यामध्ये तळमजल्यावर रंगमंच व्यवस्था तसेच पहिल्या मजल्यावर विविध खेळांसाठी उपयोगी असे सभागृह व प्रसाधनगृह व्यवस्था करण्यात आलेली आहे. यावेळी महापौर महोदयांसमवेत इतर मान्यवरांच्या हस्ते मैदान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.