सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : ओरिएंटल एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे नवी मुंबई येथील सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स आणि टेक्नॉलॉजी, फार्मसी महाविद्यालय, विधी महाविद्यालय, बी.एड महाविद्यालय, अकरावी/बारावी ही विविध महाविद्यालये विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाचे, महाविद्यालय सुरु करण्यासाठी असलेले सर्व निकष व अटी धाब्यावर बसवून सुरु आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुलगुरू – मुंबई विद्यापीठ, संचालक – तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र, अध्यक्ष – अखिल भारतीय तंत्र शिक्षण संचालनालय दिल्ली, अध्यक्ष – विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली, मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य, राज्यपाल – महाराष्ट्र राज्य, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री – महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी तक्रार करून सदर महाविद्यालयावर चौकशी समिती नेमून महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नवी मुंबई शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी केली आहे.
सदर शिक्षण संस्थेमध्ये कनिष्ठ महाविद्यालय (अकरावी/बारावी) आणि पदवी महाविद्यालय, बी.फार्मसी आणि एम.फार्मसी, बी.एड. महाविद्यालय, विधी महाविद्यालय हे सर्व एक एकर जागेमध्ये (ॠ+7) मजल्यांच्या एकाच इमारतीमध्ये सुरु आहे. परंतु अखिल भारतीय तंत्र शिक्षण संचालनालय, विद्यापीठ अनुदान आयोग आणि महाराष्ट्र शासन यांचे महाविद्यालय सुरु करण्यासाठीचे जागेचे निकष व अटी पुढीलप्रमाणे आहेत. बी.एड. आणि कनिष्ठ महाविद्यालयासाठी एक एकर जागा, विधी महाविद्यालयासाठी एक एकर जागा, पदवी महाविद्यालयासाठी दोन एकर जागा आणि बी.फार्मसी आणि एम.फार्मसाठी 0.75 एकर जागा आवश्यक असून माजी शिक्षण मंत्री जावेद खान यांचे ओरिएंटल एज्युकेशन सोसायटीची ही विविध महाविद्यालये सर्व नियम पायदळी तुडवून राजरोसपणे सुरु असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नवी मुंबई शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी केला आहे.
बी.फार्मसी, एम.फार्मसी, कनिष्ठ महाविद्यालय, विधी महाविद्यालय, बी.एड. महाविद्यालय, पदवी महाविद्यालय असे विविध अभ्यासक्रम एकाच इमारतीत सुरु असून, अखिल भारतीय तंत्र शिक्षण संचालनालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र इमारत असणे बंधनकारक असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या विविध महाविद्यालयांसाठी विहित निकषांनुसार सेमीनार रूम, लेक्चर रूम, लायब्ररी, प्रयोगशाळा, संगणक रूम असणे गरजेचे आहे. ते या महाविद्यालयात नियमानुसार नाही. सदर महाविद्यालयामध्ये निकषानुसार अध्यापक वर्ग/ कर्मचारी वर्ग नाही. महाविद्यालयात हेल्थ केअर सुविधा नाहीत, तसेच उपहारगृह सुद्धा महापालिकेच्या खेळाच्या मैदानावर अतिक्रमण करून सुरु केलेले आहे. सदर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सोय नाही, जिमखानाच्या नावावर दोन कॅरम बोर्ड आणि एक तुटलेले टेबल टेनिस बोर्ड असल्याचे नवी मुंबई मनसे विद्यार्थी सेनेचे उपशहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर यांनी म्हटले आहे.
अशा एक ना अनेक सोयी सुविधांची विद्यार्थ्यांना वाणवा असताना आणि विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्र शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासन यांचे जागे संदर्भातले आणि सोयी सुविधांसंदर्भातले सर्व नियम व अटी शर्थींना बगल देऊनही तंत्र शिक्षण संचालनालय, विद्यापीठ अनुदान आयोग, मुंबई विद्यापीठा मधील अधिकार्यांनी राजकीय दबावापोटी सर्व नियम धाब्यावर बसवून सदर महाविद्यालयाला मान्यता दिल्याचा आरोप मनसेने केला आहे.
मनसेने दिलेल्या निवेदनात सदर शिक्षण संस्थेवर तात्काळ चौकशी समिती नेमून महाविद्यालयाने शासनाच्या अटी व नियमांची जर पायमल्ली केली असेल तर त्यांची मान्यता रद्द करण्याची मागणी केल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर सचिव निखील गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.