सुजित शिंदे : 9619197444
मुंबई, दि. ५ : शिर्डी साईबाबा संस्थानातर्फे यावर्षी साजरा करण्यात येणार असलेल्या श्री साईबाबा समाधी शताब्दी उत्सवासाठीच्या तयारीची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश जलसंधारण मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज दिले.
श्री साईबाबा समाधी शताब्दी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर करून विविध कामे करण्याचे निर्देश दिले होते. या कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी शिर्डी साईबाबा संस्थान, विश्वस्त व शासकीय अधिकाऱ्यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली.
या बैठकीत मंत्री प्रा. शिंदे यांनी यापूर्वीच्या बैठकीत सुचविलेल्या कामांचा आढावा घेत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच इतर विभागाकडून भरावयाची पदे, शताब्दी महोत्सवाची प्रसिद्धी याबाबत विविध विभागांशी समन्वय साधून कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
श्री साईबाबा समाधी शताब्दी उत्सवासाठी येणाऱ्या सर्व साईभक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रा. शिंदे यांनी दिल्या. समाधी उत्सवासाठी निश्चित केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेण्यात येणार असल्याचे मंत्री प्रा. शिंदे यांनी सांगितले.