सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील अपघातांचा आलेख दिवसेंगणिक वाढत चालला आहे. खड्डे दुरूस्तीकडे झालेला कानाडोळा आणि निकृष्ठ दर्जाचे झालेले डांबरीकरण यामुळे हे अपघात होत असल्याचे सांगत इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष आणि काँग्रेसचे रोजगार व स्वंयरोजगार विभाग अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी याप्रकरणी कंत्राटदाराविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी नेरूळ पोलिस ठाण्यामध्ये गुरूवारी केली आहे.
सायन-पनवेल महामार्गावर नेरुळ, उरणफाटा येथे मंगळवारी (4 जुलै) सकाळी अनेक वाहने घसरून झालेल्या भिषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. सायन पनवेल महामार्गाचे मोठ्या प्रमाणात डागडुजीचे काम करण्यात आले आहे. त्यात खड्डे दुरूस्तीच्या कामाकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येते तसेच शासकीय निकष धाब्यावर बसवून कंत्राटदाराने उड्डाणपूलावर निकृष्ठ दर्जाचे डांबरीकरणाचे काम केल्यामुळे रस्ता अतिशय गुळगुळीत झाला आहे. त्याचा परिणाम वाहने या गुळगुळीत रस्त्यावरून घसरू लागली आहेत. गेल्या 34 दिवसांमध्ये सुमारे 43 वाहने या गुळगुळीत डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरून घसरून अनेक वाहनचालकांना मार लागल्याचे समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वीच एसटीच्या एका चालकानेदेखील अशाप्रकारची तक्रार एसटी महामंडळाकडे करून वाहनचालकांना या रस्त्यावर सावधगिरीने वाहने चालविण्याचा मेसेजच व्हॉट्सअपवर पाठवला आहे. यावरून सायन-पनवेल महामार्ग वाहनांसाठी धोकादायक ठरू लागल्याचे आढळून आले आहे.
सायन-पनवेल महामार्ग अतिशय वर्दळीचा आहे. पश्रि्चम महाराष्ट्र तसेच कोकणाला जोडणार्या या महामार्गावरून दररोज लाखो वाहने धावत असतात. सध्या पावसाचेही दिवस आहेत. आधीच निकृष्ठ डांबरीकरणामुळे गुळगुळीत झालेला रस्ता पावसात अधिक धोकादायक झाला आहे. त्याचा परिणाम रोज धावणार्या वाहनांसाठी हा महामार्ग कर्दनकाळ ठरू लागला आहे.
एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार रस्ते अपघात टाळण्यासाठी सुरक्षित वाहने चालविण्याचे आवाहन करतात. तर दुसरीकडे रस्त्यांच्या कामातच भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे. तरी सायन-पनवेल या अतिशय वर्दळीच्या या महामार्गाच्या डांबरीकरणाच्या कामात भ्रष्टाचार करून वाहनचालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तसेच इतर नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी डांबरीकरणाचे काम करणार्या कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसच्यावतीने आणि समस्त नागरिकांच्यावतीने करीत आहोत.
जोपर्यंत सायन-पनवेल महामार्गाच्या निकृष्ठ डांबरीकरणाचे काम दुरूस्त केले जात नाही, तोपर्यंत प्रवाशांच्या आणि वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी या मार्गावर जागोजागी मार्गदर्शक फलक लावावेत तसेच वाहतूक पोलिसांना वाहन चालकांच्या मदतीसाठी तैनात करावे, अशी मागणीही रवींद्र सावंत यांनी केली आहे.