पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलला भेट देणारे भारताचे पहिलेच पंतप्रधान. त्यांच्या या ऐतिहासीक भेटीचे जगभरात पडसाद उमटत आहेत. देशातील विरोधी पक्षानेही या भेटीचे स्वागत केले आहे. या भेटीचे औचित्य साधून पनवेल आणि इस्त्रायल यांच्या अनेक वर्षांपासूनच्या ऋणानुबंधाचा थोडक्यात घेतलेला आढावा.
सुमारे 200 वर्षांपूर्वी म्हणजेच इस्त्रायल हा देश अस्तित्वात येण्यापूर्वी काही ज्यू व्यापारी जहाजाने भारताकडे येण्यास निघाले. वादळामुळे त्यांचे जहाज भरकटले आणि ते अलिबाग नजीकच्या नागाव किनार्याला लागले. या जहाजातील व्यापार्यांना येथील भाषा ज्ञात नव्हती. तसेच येथील आगरी-कोळींना ते काय म्हणताहेत हे कळत नव्हते. केवळ एकमेकांना इशारे करून त्यांनी या वाट चुकलेल्या इस्त्रायलींना आश्रय दिला आणि हे इस्त्रायली येथेच स्थायीक झालेत. त्यांनी येथील भाषा आणि संस्कृती माहित करून घेतली. तसेच त्यांना येथील आगरी-कोळी बांधवांनी सामावूनही घेतले. कालांतराने ही मंडळी पनवेल परिसरहातही स्थायीक झालीत. कधी काळी 250 ते 300 लोकसंख्या असलेला हा समूदाय आजघडीला पनवेल परिसरात जेमतेम 60 ते 70 इतकाच आहे. या समुदायाच्या नावाने इस्त्रायली तलाव, इस्त्रायल नाका आणि त्यांचे प्रार्थनालय अर्थात सिनेगॉग या स्मृती आजही टिकून आहेत.
पनवेल येथे बेन्स एल प्रार्थनालय 170 वर्ष जुने आहे. 1849 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. अलीकडेच काही वर्षांपूर्वी या प्रार्थनालयाची पुर्नंबांधणी करण्यात आली. दर शनिवारी सकाळी या प्रार्थनालयात ज्यू समाजाचे बांधव प्रार्थना करतात. केवळ ज्यूच नव्हेतर अन्य धर्मिय देखील येथे प्रार्थनेसाठी येत असतात अशी माहिती या प्रार्थनालयाचे सचिव मोझेस कोर्लेकर यांनी दिली. धार्मिक श्रद्धा असल्यामुळे अन्य भागातील ज्यू मंडळी देखील या प्रार्थनास्थळाला भेट देत असल्याचे कोर्लेकर म्हणाले.
आज घडीला पेण मध्ये 8 ते 10, अलिबागमध्ये 8 ते 10, रेवदंडा 6 आणि पनवेल परिसरात 20 कुटुंब राहतात. या सर्व कुटुंबातील सदस्यांची संख्या एकूण संख्या सुमारे 150 ते 170 असावी असे कार्लेकर यांनी सांगितले.
ज्यू समाज लोकसंख्येने कमी असला तरी शांतता प्रिय आहे. आपल्या रुढी, प्रथा, परंपरा आणि सण-उत्सव तितक्यात उत्साहाने साजरा करतो. सप्टेंबर ते ऑक्टोंबर दरम्यान ज्यू धर्मियांचे नवी वर्ष असते. या दिवशी ही मंडळी समुद्रावर जाऊन लोकसंख्या वाढावी यासाठी प्रार्थना करतात. ऑक्टोबर महिन्यात तीपूर घसण हा ज्यू धर्मियांचा सण असतो. या दिवशी सर्व मंडळी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून प्रार्थनेला येतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात.
सिमहात तोरा अर्थात सेफेर तोरा हा एक ज्यू धर्मियांचा आनंदाचा सण आहे. या दिवशी देवाने 10 आज्ञा दिल्या आहेत. त्यांचेे पालन करण्याचा निर्धार ही मंडळी करतात. डिसेंबर महिन्यात हनुका हा उत्सव 8 दिवस चालतो. या उत्सवाच्या पहिल्या दिवशी ज्यू बांधव 2 दिवे लावतात. त्यात दररोज 1 दिवा वाढवून उत्सव साजरा केला जातो.
पनवेल हे प्राचीन शहर आहे. या शहराचे पूर्वीचे नाव पानाव-एल होते. पानाव म्हणजे देव आणि एल आशीर्वाद अशी आख्यायीका ज्यू बांधवांमध्ये आहे. कधीकाळी 350 ते 400 समाजबांधव पनवेल परिसरात होते. त्यावेळी इस्त्रायली तलाव, इस्त्रायल नाका अस्तित्त्वात आले. आज नव्या मंडळींसाठी ही नावे कालबाह्य होत आहेत. आजघडीला 100च्या आत लोकसंख्या असलेली ही मंडळी नोकरी आणि उद्योग करून येथे आनंदाने वास्वव्य करीत आहेत. इस्त्रायल या देशाला मान्यता मिळाल्यानंतर येथील बरीचशी मंडळी मायदेशी परत गेली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायल दौर्यावर गेल्यावर गुजरातच्या एका खासदाराने सूरत येथे ज्यू बांधवांचा भव्य असा सत्कार केला. त्या कार्यक्रमाला येथील अनेक ज्यू बांधव उपस्थित होते. जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा भारत देश आम्हाला सर्वाधिक सुरक्षीत वाटतो. त्यामुळे आम्ही येथे समरस झालो असल्याचे प्रार्थनालयाचे सचिव मोझेस कोर्लेकर यांनी म्हटले आहे.
-मदन बडगुजर