सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : चीनमध्ये उपलब्ध असलेल्या चायनीज पदार्थांची माहिती मिळवीत असताना चीनमध्ये मिळत नसलेल्या मात्र पनवेलमध्ये चायनीज नावाने विकल्या जाणार्या पदार्थांची भलीमोठी यादी समोर येते. चायनीज वडा,चायनीज समोसा, चायनीज डोसा,चायनीज भेळ,मोमोज असे अनेक पदार्थ चायनीज नसून भारतीयांनीच फेमस केले आहेत. कोणत्याही गोष्टीचे भारतीयीकरण करून आत्मसात करण्याच्या भारतीयांच्या वृत्तीचाच परिपाक त्यामुळे समोर येतो. त्यामुळे भारत चीन या दोन्ही देशांमध्ये कितीही वातावरण तापले तरी हे चटपटीत ”इंडो चायनीज” पदार्थ एतद्देशीयांच्या जिभेचे चोचले पुरवतच राहणार असेच म्हणावे लागेल.
स्ट्रीट फूडमध्ये सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय पदार्थ कोणते असतील तर त्यामध्ये चायनीज पदार्थांशिवाय हि यादी सुरु होत नाही व संपतही नाही. कांही वर्षांपूर्वी चायनीज भेळ नामक चटपटीत पदार्थाने सायंकाळच्या चहाच्या आधी स्थान मिळविले आहे. तर संध्याकाळचे जेवण सुपशिवाय सुरु होत नाही. या चायनीज नामक भारतीय पदार्थानी वाट्टेल तशी मूळ चायनीज रेसिपीची तोडमोड करून नवा इंडोचायनीज अवतार घेतला आहे. याला कारणीभूत मागणीदार ग्राहकवर्ग आहे. मुळातच मसालेदार आणि झणझणीत भारतीय खाण्याला चायनीज आव्हान देऊ शकेल तरच ते आपलेसे केले जाईल हे चायनीज विक्रेत्यांनी हेरले. त्यामुळे मागणी तसा पुरवठा केल्यामुळे भारतीयांच्या खाद्य संस्कृतीत या इंडोचायनीज पदार्थानी स्थान मिळविले आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील स्वप्नपूर्ती खारघर वसाहतीमध्ये उत्सव चौक परिसरात सायंकाळी खाऊगल्ली बहरलेली असते. येथे मोमोज नावाचा इंडोचायनीज पदार्थ खूप फेमस आहे. नवीमुंबईतील खवय्ये येथे वेगवेगळ्या मोमोजचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. पनवेलमध्ये बिकानेर आणि निळकंठ या प्रतिष्ठित फरसाण आणि मिठाई विक्रेत्यांनी चायनीज भेळ हा प्रकार येथे लोकप्रिय केला आहे. नाक्यानाक्यावर चायनीज भेळ देणार्या गाड्या तसेच चायनीज वडे,समोसे विक्रेते होते मात्र महानगरपालिकेने कारवाई केल्यामुळे सध्या त्यांना खवय्ये मुकलेले आहेत. बिकानेर व निळकंठ या दुकानांमध्ये फ्राय राईस आणि फ्राय न्युडल्स अवघ्या 30 रुपयांमध्ये मिळत असल्यामुळे याठिकाणी सायंकाळी प्रचंड गर्दी पाहायला मिळते. मन्चुरिअन तसेच मन्चुरिअन भेळ असले प्रकार चीनमध्ये आढळत नाहीत. तसेच भारतीयांनी जे सूपचे नवे प्रकार तयार करून लोकप्रिय केलेत ते चायनिज नसून इंडोचायनीज गटामध्येच मोडतात.
*****
भारत हे चीनचे मार्केट असल्याचे बोलले जाते मात्र प्रत्येक चीनी वस्तूची नकल (डुप्लिकेट) भारतात निर्माण होत असल्यामुळे चीनचे मार्केट वाढत नसून इंडोचायनीज पदार्थांची नवी आवृत्ती तयार होत आहे. यावर लक्ष ठेवणारी आणि मूल्यमापन करून हितअहित पाहणारी यंत्रणा उभी करणे आजची खरी गरज बनली आहे.