काही दिवसाचे महत्व अनन्यसाधारण असते. काही जण आपल्या गावामुळे नावारूपाला येतात तर काहीजण आपल्या कर्तृत्वाच्या बळावर गावाला नावारूपाला आणतात. समाजव्यवस्थेत पावलापावलावर आपल्याला असंख्य समाजसेवक कार्यरत असलेले पहावयास मिळतात. पण त्यांच्या कर्तृत्वाला पडलेल्या मर्यादा अथवा त्यांच्या कार्यबळावर त्यांनी मारलेली गरूड भरारी यावर त्यांचे कर्तृत्व स्पष्ट होत असते. नवी मुंबईच्या राजकारणात म्हणून गेल्या दशकभरापासून कुकशेतचा ढाण्या वाघ म्हणून सुरज बाळाराम पाटील ओळखले जात आहेत. 20 जुलै हा कुकशेतचा ढाण्या वाघ म्हणून ओळखल्या जाणार्या सुरज पाटील यांचा जन्मदिवस.
सध्या नवी मुंबई महानगरपालिकेत सुरज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वीकृत नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष म्हणून सुरज पाटील कार्यरत आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीत कुकशेत व सारसोळे गावाचा समावेश असणार्या प्रभाग 85 आणि 86 या दोन प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आणण्यात सुरज पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच नेरूळ गावातील प्रभाग 95 मधून निवडून आलेले युवा नगरसेवक गिरीश म्हात्रेंचा नवी मुंबईतील जायंट किलर म्हणून समावेश होतो. परंतु त्यांना राजकारणातील नेरूळ गाव या स्थानिक पातळीवरील जायंट किलर म्हणून नावारूपाला आणण्यात सुरज पाटील यांचे पडद्यामागील परिश्रम सर्वांनी जवळून पाहिलेले आहे.
प्रत्येकाला आपल्या सामाजिक कार्याची पोचपावती मिळत असते. एप्रिल 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत देशभर मोदी लाट होती. नवी मुंबई शहर हा परिसर राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्यायाने नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणार्या लोकनेते गणेश नाईकांचा बालेकिल्ला म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. परंतु मोदी लाटेत मोठ्या प्रमाणावर सर्वत्रच राजकीय पडझड झाली. मोठेमोठे राजकीय प्रस्थ उन्मळून पडले. नवी मुंबईसारख्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल 47 हजार मतांनी पिछाडीवर जाण्याची वेळ आली. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा शिलेदार असणार्या सुरज पाटलांनी आपला कुकशेतचा गढ राखला. वादळ येवो, लाट येवो, प्रभागात आपली कामे असल्यावर जनता आपल्या सोबतच राहते हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवित सुरज पाटलांनी राष्ट्रवादी काँग्र्रेसच्या अन्य नगरसेवकांच्या व पक्षीय पदाधिकार्यांच्या आणि बालाजी तसेच व्हॉईट हाऊसच्या सभोवताली चमकेशगिरी करणार्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. त्यापाठोपाठ झालेल्या ऑक्टोबर 2014च्या विधानसभा निवडणूकीतही मोदी लाट कायम राहीली. लोकनेते गणेश नाईकांना अवघ्या 1200 मतांनी पराभूत व्हावे लागले. पण याही निवडणूकीत सुरज पाटलांनी आपला कुकशेतचा गढ कायम राखत कुकशेत मतदारसंघातून गणेश नाईकांना मताधिक्य मिळवून दिले. आज नेरूळ पश्चिम आणि पूर्व परिसरातील, सीवूड्डस भागातील तसेच बेलापुर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील घटक गणेश नाईकांच्या सभोवताली चमकेशगिरी करताना पहावयास मिळतात. त्यांनी त्यांच्या प्रभागात विधानसभेेला गणेश नाईकांना आघाडी नाही किमान बरोबरी जरी ठेवली असती तरी आज लोकनेते गणेश नाईक किमान 10 हजाराच्या मताधिक्याने विधानसभेत आपणास दिसले असते. ज्यांना मताधिक्य देता आले नाही, आज तीच मंडळी दादांच्या सभोवताली वावरताना पहावयास मिळत आहेत. त्या तुलनेत सुरज पाटलांचे पायही आजही जमिनीवरच आहेत. कर्तृत्व गगन भरारी मारत असले तरी जमिनीवर पाय ठेवून वावरणारे मोजकेच घटक असतात. त्यामध्ये सुरज पाटलांचा नवी मुंबई स्तरावर अग्रक्रमाने समावेश होतो. कट्टर आणि कडवट नाईक समर्थक म्हणून सुरज पाटलांची नवी मुंबईच्याच नाही तर ठाण्याच्या व रायगडच्या राजकारणात ओळख आहे. अर्थात गेल्या तीन-चार वर्षात सुरज पाटलांना व त्यांच्या परिवाराला कट्टर व कडवट नाईक समर्थक असल्याची जबरी किमंत मोजावी लागल्याचे नवी मुंबईचे जवळून पाहिले आहे.
कुकशेत गाव सध्या नवी मुंबईतील बेलापुर विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात चर्चेचा केंद्रबिंदू बनलेले आहे. राजकारणात अडीच दशके वावरणार्यांना व यापूर्वी मोठमोठी पदे भूषविणार्यांना कुकशेत गावाविषयी कमालीचा पुळका आल्याचे सर्वांनाच पहावयास मिळत आहे. कुकशेतचा विषय निघाला की सुरज पाटलांचे नाव त्यांच्या समर्थकांच्याच नाही तर त्यांच्या कट्टर विरोधकांच्या मुखी येतेच. कुकशेत गाव आणि सुरज पाटील हा गेल्या दीड दशकातील एक घनिष्ठ ॠणानुबंध निर्माण झाला आहे. कुकशेत गाव हा सुरज पाटलांचा श्वास आहे, परिवार आहे हे कुकशेतविषयी नव्याने कालपरवा पुळका आलेल्या राजकीय घटकांना समजणार नाही. कारण कुकशेतच्या विकासाविषयी परिश्रम करताना सुरज पाटलांच्या मनात कोणताही राजकीय स्वार्थ नाही. एक कर्तव्याची भावना आहे. कुकशेत गावच्या विकासासाठी नगरसेवक होण्यापूर्वीपासून एक कुकशेतचा युवा ग्रामस्थ म्हणून सुरज पाटील परिश्रम करत आहेत. आज उद्योग व्यवसायातून सुरज पाटलांकडे चार चाकी वाहन असले तरी कुकशेतच्या विकासाच्या फाईली घेवून बोनकोडेला तसेच मंत्रालयात जाताना एनएमएमटीच्या बसमधून तसेच रेल्वेच्या द्वितीय वर्गातून प्रवास करताना सुरज पाटलांना आम्ही अनेक वर्षे जवळून पाहिले आहे. कुकशेत गाव हे नवी मुंबईतीलच नाही तर महाराष्ट्रातील एक आदर्श गाव बनावे या एकमेव महत्वाकांक्षेपायी सुरज पाटील नेहमीच पछाडलेले आहेत. कुकशेत ग्रामस्थांना सुविधा मिळाव्यात, त्यांच्या समस्यांचे निवारण व्हावे यासाठी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे सुरज पाटील परिश्रम करत असतात. कुकशेतचे स्थंलातर झाले तरी सुविधा मिळाल्या नव्हत्या. या सुविधांसाठी जीवाचे रान करणारा सुरज पाटील आम्ही जवळून पाहिला आहे, अनुभवला आहे. कुकशेतच्या ग्रामस्थांना भाडेकरार नको तर मालकी हक्काचे भुखंड हवेत या एकमेव मागणीसाठी सुरज पाटील गेल्या दशकभरापासून संघर्ष करत आहेत. कुकशेतच्या विकासासाठी संघर्ष करणार्या सुरज पाटलांच्या पाठीवर शाबासकी मिळण्याऐवजी राजकीय सुडापोटी पेटलेल्या काहींनी षडयत्रांत व्यस्त राहून सुरज पाटलांना अडचणीत आणण्याचे काम केले आहे व आजही करत आहेत. दिवस कोणाचे थांबत नाहीत. आज सुपात असलेले जात्यात कधी ना कधी जाणारच. नियती आपले काम चोख बजावते. संयम व सहनशीलता अंगी बाळगणे आवश्यक आहे. कुकशेत आणि सुरज पाटील या विषयावर बोलावयाचे झाल्यास एक संपूर्ण ग्रंथच लिहावा लागेल. जन्मदिवसाच्या शुभेच्छा देताना हा प्रपंच तुर्तास नको. कुकशेतच्या इतिहासात सुरज पाटलांचे स्थान आणि महत्व कोणी नाकारू शकणार नाही आणि कितीही प्रयत्न केले तरी पुसुही शकणार नाही. सटवाईनेच कुकशेतच्या भाळी सुरज पाटलांचा योग लिहिला असल्याने सटवाईच्या लिखितावर ओरखडे उमटणारे अजून जन्माला आले नाहीत.
नेत्याचे कडवट समर्थक असणे याची कार्यकर्त्याला नेहमीच मोठी किंमत मोजावी लागते. ती किमंत सुरज पाटलांना गेल्या दोन-अडीच वर्षात चांगल्या प्रकारे मोजावी लागलेली आहे. बोनकोडेकरांच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द झेलण्यासाठी व तो शब्द पूर्ण करण्यासाठी सुरज पाटील जीवाचे रान करतो हे नवी मुंबईकरांनी जवळून पाहिले आहे. राजकारणात लोकनेते गणेश नाईकांचा कडवट आणि कट्टर समर्थक असणार्या सुरज पाटलांचे राजकीय खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम काही विरोधकांकडून जाणिवपूर्वक केले जात आहे. भाजपा नेते सुरेश हावरे यांच्याच शब्दांमध्ये सांगावयाचे झाल्यास राजकारण आता चुलीपर्यत येवून पोहोचले आहे. सुरज पाटलांचा ज्यामध्ये काडीमात्र संबंध नाही अशा प्रकरणातही सुरज पाटलांना गोवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ठिकठिकाणी बैठकांही सुरु आहेत. फाईली बनविण्याचे उद्योगही सुरु आहेत. कार्यकर्ता जगला, कार्यकर्ता टिकला तरच नेता टिकतो याची जाणिव आता बोनकोडेकरांना वेळीच झाली पाहिजे. दादा म्हणजे लोकनेते गणेश नाईक म्हणजे भोळ्या शिवशंकराचा अवतारच म्हणून ओळखले जातात. राजकारणात विरोधकांचे विष प्राशन करून त्यांना सतत सत्तेचे अथवा अर्थकारणाचे अमृत देण्याचे काम दादांनी केले आहे. परंतु या भोळ्या स्वभावामुळेच अनेकदा दादा व त्यांचे जवळचे कार्यकर्ते अडचणीत आले आहेत. दादांनी आता तिसरा डोळा उघडणे कडवट कार्यकर्त्यांसाठी व खर्या निष्ठावंतांसाठी आवश्यक आहे. सुरज पाटलांसारख्या कडवट कार्यकर्त्याचे खच्चीकरण करण्यात विरोधक यशस्वी झाले तर कडवट कार्यकर्ता होताना अनेकदा शतदा विचार करतील. कंत्राटदार, ठेकेदार व स्वार्थी मंडळींचा गोतावळा असणे भूषणावह नसते. ते स्वार्थापायी जवळ आलेले असतात. आज दादांच्या सभोवताली काही घटक दिसतात, ते पालिका निवडणूकीच्या वेळेस भाजपाशी मनोमिलाफ करण्याच्या तयारीत होते हे आजही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रामाणिक कार्यकर्ते विसरलेले नाहीत. त्यामुळे आज सुरज पाटलांच्या सभोवताली एक जाळे विणले जात आहे, त्याबाबत दादांनी ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे.
सुरज पाटील हे व्यक्तिमत्व आराम कधी करते हा एक प्रश्नचिन्हच आहे. पहाटे अथवा रात्री कधीही सुरज पाटलांना संपर्क करा, हा माणूस कोणाच्या तरी मदतीसाठी पोलिस ठाण्यात अथवा रूग्णालयात पहावयास मिळतो. कोणाच्या बारशापासून ते मयत-दशक्रिया आदी कार्यक्रमात हा माणूस आर्वजून उपस्थित असतो. युवा नेता होवूनही प्रत्येक कार्यक्रमात कार्यकर्ता म्हणून वावरण्यात, कार्यक्रमाचे नियोजन करण्यात सुरज पाटील व्यस्त असतात. सुरज पाटील एक सामाजिक कार्यातील अग्नीकुंड आहे. हे अग्नीकुंड सतत पेटत राहणे समाजहितासाठी आवश्यक आहे. घरादाराकडे कमी वेळ देवून जनसेवेला अधिकाधिक वेळ समर्पित करणारे सुरज पाटील नेरूळवासियांनी पाहिले आहेत, अनुभवले आहेत. सुरज पाटलांना उदंड आयुष्य मिळणे समाजहितासाठी आवश्यक आहे. जनहितासाठी, सामाजिक कार्यासाठी, जनकल्याणासाठी, उपेक्षितांसाठी सुरज पाटील तुम्ही दिर्घायू व्हा!