महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेच्या वर्तुळात असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आदराने घेत आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांबद्दल जाहिरपणे नाराजी व्यक्त करण्याचे अथवा आपली राजकीय महत्वाकांक्षा जाहिररित्या प्रकट करण्याचे धाडस कोणीही दाखवित नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचे आपण स्पर्धक असल्याचा दावा करत ज्यांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहिली, त्यांचे पुढे काय झाले हे महाराष्ट्राने जवळून पाहिले आहे आणि भाजपातील मंडळींनी अनुभवले आहे. तथापि गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या वर्तुळात आणि मंत्रालयीन पातळीवर मुख्यमंत्री बदलाची चर्चा जोर धरू लागली आहे. ब्राम्हणी चेहरा घेवून निवडणूकांना सामोरे जाणे अवघड असल्याचा तर्क बांधत मुख्यमंत्री फडणवीसांना केंद्रात बढती देवून त्याजागी कोल्हापुरातील मराठा चेहरा मुख्यमंत्रीपदी बसविला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. विनोद तावडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्यासह मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतील बहूचर्चित नावे आता थंडावली आहेत. चंद्रकांतदादा पाटील हेच एकमेव नाव सध्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. चंद्रकांतदादा पाटलांचे थेट अमित शाहांशी सख्य असल्यामुळे त्यांचा तावडे, खडसे आणि पालवे होणे शक्य नसल्याची भाजप वर्तुळात चर्चा सुरू आहे.
ऑक्टोबर 2014 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत सव्वाशेच्या आसपास जागा जिंकत भाजपने सत्ता मिळविली. त्यावेळी मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत फडणवीसांसह एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासह अनेक नावे चर्चेत होती. पक्षाने आणि नागपुर येथील सत्ताबाह्य केंद्रांने फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतर काळाच्या ओघात मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असणार्यांना तसेच महत्वाकांक्षा बाळगणार्यांना विविध घोटाळ्यांच्या चक्रव्यूहात अडकावे लागले. एकनाथ खडसेंसारख्या मातब्बरांवर तर मंत्रिमंडळाच्या बाहेर जाण्याची वेळ आली. तावडे, मुंडे यांना थंडोबा होण्याची पाळी आली. ऑक्टोबर 2014 पासून राज्याचा कारभार हाकताना कोणत्याही घोटाळ्यात अथवा भ्रष्टाचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा उल्लेख न झाल्यामुळे स्वच्छ प्रतिमा असलेला मुख्यमंत्री फडणवीसांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभला असल्याची चर्चा सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाच्या वर्तुळात सुरू झाली आहे. फडणवीसांच्या वाटचालीत विरोधी पक्षाऐवजी स्वपक्षातील घटकच पडद्याआडून अडथळे निर्माण करण्याचे काम करण्यात समाधान मानत आहे. त्यातच सातत्याने हेलिकॉप्टर प्रकरण घडत असल्यामुळे हे घडतेय की घडवून आणले जातेय याबाबत महाराष्ट्राच्या जनतेत कुजबुज सुरू झालेली आहे. विधानसभा निवडणूकीपाठोपाठ झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांतही भाजपाने मुसंडी मारत विरोधकांना चारीमुंड्या चीत केले आहे. जिल्हा परिषद निवडणूका असो अथवा महानगरपालिका निवडणूका असो, या सर्वच स्थानिक निवडणूकांमध्ये प्रचाराची जबाबदारी स्वत: मुख्यमंत्र्यांनी सांभाळली. कोणा नेत्याच्या भरवशावर नाही तर स्वत: पुढे राहून आक्रमक भूमिका घेत भाजपची भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे मांडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये भाजपाचा वारू विजयाच्या नाही तर महाविजयाच्या लाटेवर वावरू लागल्याने मुख्यमंत्र्यांमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढीस लागला. शेतकरी संप आणि कर्जमाफी प्रकरणात मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचे जाणिवपूर्वक प्रयत्न विरोधकांऐवजी स्वपक्षातील घटकांकडूनच अधिक प्रमाणावर करण्यात आले. शेतकरी संप आणि कर्जमाफी विषयामध्ये मुख्यमंत्री एकाकी कसे पडतील याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली. त्यातूनही मुख्यमंत्री तावून सुलाखून बाहेर पडले आहेत. शेतकरी संप आणि कर्जमाफी यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात भाजपप्रती कमालीची नाराजी वाढली आहे. ही नाराजी कॅश करण्यासाठी शिवसेना, कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कमालीची आक्रमक झाली आहे. भाजप सत्तेवर असल्याने घोटाळा प्रकरणी सुरु असलेले विरोधी पक्षातील घटक भाजपवर कडवट टीका करण्याचे टाळत सत्तेतील केवळ शिवसेनेवरच तोंडसुख घेण्याचा एककलमी कार्यक्रम राबवित आहेत. फडणवीसांना केंद्रात बढती देवून त्याजागी चंद्रकांतदादा पाटील लवकरच विराजमान होणार असल्याच्या राजकीय वर्तुळात पैजांही झडू लागल्या आहेत. राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूका लागल्या तर ब्राम्हण चेहरा घेवून निवडणूका जिंकता येणे शक्य नाही, मराठा चेहरा घेवूनच निवडणूकीला सामोरे जावे लागणार असल्याचा तर्कवाद भाजपातीलच काही मंडळी चर्चेदरम्यान करू लागली आहे. भाजप आमदारांतच नाही तर मंत्र्यांमध्येही फडणवीस समर्थकांची संख्या लक्षणीय आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीमुळे सरकारमधील मंत्री आणि भाजपचे आमदार कमालीचे प्रभावित आहेत. मुख्यमंत्री समर्थकांना मात्र ब्राम्हण आणि मराठा चेहरा हा वाद मान्य नसल्याने ते या प्रकाराविषयी खासगीत नाराजी व्यक्त करत आहेत. आदर्श कारभार, स्वच्छ प्रतिमा, पक्षाला यश मिळवून देणारा आक्रमक चेहरा आदी निकषावर मध्यावधी निवडणूका झाल्यास फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजप स्वबळावर येण्यास सक्षम असल्याचे मुख्यमंत्री समर्थकांकडून तसेच चाहत्यांकडून उघडपणे बोलले जात आहे. मुख्यमंत्री फडणवीसांना केंद्रात पाठविण्याच्या हालचाली म्हणजे त्यांचे राज्याच्या राजकारणातील महत्व कमी करून मुख्यमंत्रीपदावर अन्य व्यक्तींच्या नियुक्तीस मार्ग मोकळा करून देण्यासारखे आहे. परंतु मुख्यमंत्रीपदावर बसलेली व्यक्ती यदाकदाचित कोणत्या प्रकरणात अडकून पक्षाची प्रतिमा मलीन झाल्यास कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढवायच्या याचा पुन्हा नव्याने शोध घ्यायचा का, असा प्रश्न फडणवीसांच्या राजकारणातील चाहत्यांकडून विचारण्यात येत आहे. येत्या तीन-चार महिन्यात मुख्यमंत्रीपदी नवीन चेहरा विराजमान होणार आणि फडणवीस केंद्रात जाणार असे मंत्रालयीन पातळीवर ठामपणे सांगितले जात आहे. कोल्हापुरकर मंडळी मात्र आमच्याच भागातील मुख्यमंत्री होणार असल्याचे छातीठोकपणे बोलू लागली आहे. त्यामुळे आता पुढच्या दोन-तीन महिन्यात काय घडामोडी होणार याकडेच राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीले आहे.
– संदीप खांडगेपाटील
8369924646