स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
पनवेल : स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट असे समीकरण ठेवून वाटचाल करत असलेली पनवेल महापालिका सध्या हागणदारीमुक्त पनवेल घोषणेच्या तयारीत आहे. त्यानुसार महापालिका हद्दीतील नागरिकांनी सार्वजनिक किंवा वैयक्तीक शौचालयांचा वापर करावा, याची जनजागृती करण्याकरीता महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी पटनाट्य सादर करण्यात येत आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेनुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत पनवेल शहरात वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 1808 जणांना अनुदान देण्यात आले आहे. एका शौचालयासाठी केंद्र सरकारचे चार हजार, राज्य सरकार आठ हजार आणि उर्वरित आठ हजार महापालिकेकडून देण्यात येत आहेत. सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम अनेक ठिकाणी सुरू आहे. महापालिकेच्यावतीने लवकरच हागणदारी मुक्तीची घोषणा केल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारकडून पाहणी करण्यात येणार आहे, त्यानंतर पनवेल महानगरपालिका हागणदारीमुक्त असल्याचे निश्चित होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी शौचास उघड्यावर न बसता सार्वजनिक अगर वैयक्तिक शौचालयाचा वापर करावा, याची जनजागृतीची मोहीम महापालिकेने सुरु केली आहे. त्यानुसार आसुडगाव येथील जिल्हा परीषदेच्या शाळेत बुधवारी पथनाट्य सादर करुन विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली. भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांच्यासह मान्यवर आणि विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.