जलयुक्त शिवारमध्ये 2017-18 वर्षात 5 हजार 157 गावांचा सहभाग
स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
मुंबई : राज्यात सन 2016-17 या या वर्षभरात जलयुक्त शिवार अभियानातून2019 गावांमध्ये कामे पूर्ण झाली आहे. सन 2017-18 या वर्षासाठी एकूण 5 हजार 157 एवढ्या गावांची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. ही कामे करताना अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून गावातील पाण्याच्या स्त्रोताचे गावस्तरीय पाणलोटाचे नकाशे तयार करून ते सर्व ग्रामपंचायतींना देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मृद व जलसंधारण विभागाची आढावा बैठक आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे निर्देश दिले. यावेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, मृद व जलसंधारण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव वि. गिरीराज, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, जलसंधारण सचिव एकनाथ डवले, जलसंपदा विभागाचे सचिव पानसे,कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, सन 2015-16 या वर्षात जलयुक्त शिवार योजनेतून राज्यातील5988 गावांमध्ये कामे पूर्ण झाली आहेत. त्यावेळच्या पावसाळ्यात या योजनेचे यश दिसून आले आहे. दोन वर्षातील या योजनेच्या कामांचे आंतरराष्ट्रीय नियमानुसार त्याचे डॉक्युमेंटेशन करावे. तसेच पुढील वर्षाचा आराखडा तयार करत असताना क्षेत्रा उपचाराची कामे 70 टक्के पूर्ण झाल्यानंतर सिमेंट नालाबांधची कामे सुरू करावीत. तसेच जलयुक्त शिवारसाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेण्यात यावी. बेरोजगार युवकांना जेसीबी यंत्र खरेदी करण्यास मदत करून त्यांच्याकडून जलयुक्तमधील कंपार्टमेंट बंडिगची कामे करून घेण्यात यावी.
जलयुक्त शिवारसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांना वाल्मिमध्ये प्रशिक्षण देऊन त्यांना मास्टर्स ट्रेनर करावे. त्यानंतर त्यांच्यामाध्यमातून प्रत्येक गावात ग्रामस्थांचे प्रशिक्षण घेण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मागेल त्याला शेततळे या योजनेतून 2 लाख 74 हजार 860 अर्ज प्राप्त झाले होते. यामधील 1लाख 43 हजार 122 अर्जांना मान्यता देण्यात आली असून 47 हजार 937 शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
सिंचन विहिरींची कामे ही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.
जलयुक्त शिवार योजनेचा वेगळा लोगो तयार करण्याची सूचना करून जलसंधारण मंत्री श्री. शिंदे म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेतून नदी, नाले पुनरुजीवनची कामे ही लोकसहभागातून करण्यात यावी. पाझर तलाव, गाव तलाव, सिमेंट नाला बांध व कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे कामेही तातडीने करावीत. तसेच मृदु व जलसंधारण विभागाचे काम तातडीने सुरू करण्यासंदर्भात विविध विभागांनी कार्यवाही करावी.