स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : यावर्षी दि. 25 ऑगस्ट ते 05 सप्टेंबर 2017 या कालावधीत ‘श्री गणेशोत्सव 2017’ संपन्न होत असून गणेशोत्सवासह त्यानंतर होणा-या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजना व कार्यवाही याबाबत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांचेसह महानगरपालिका तसेच पोलीस व एम.एस.ई.डी.सी. च्या संबंधित अधिका-यांसह पूर्वतयारीचा विस्तृत आढावा घेतला.
उत्सव आयोजनासाठी आवश्यक असलेल्या परवानगी प्रक्रियेत सुलभता यावी व मंडळांना आवश्यक परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन त्यांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने मागील वर्षीप्रमाणेच संयुक्तरित्या ‘एक खिडकी संकल्पना’ राबविण्याचे ठरविण्यात आले. याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालयांत विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी 25 जुलै ते 8 ऑगस्ट 2017 या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत गणेशोत्सव मंडळांनी तीन प्रतीत आपले परवानगी अर्ज दाखल करावयाचे आहेत. प्राप्त अर्जांवर महापालिका, पोलीस, अग्निशमन, एम.एस.ई.डी.सी. यांच्या अधिका-यांमार्फत एकत्ररित्या पाहणी करुन 7 दिवसांच्या कालावधीत परवानगी देण्याची कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. स्टेज व मंडप उभारण्यासाठी प्रथमत: स्थानिक पोलीस ठाणे तसेच वाहतुक पोलीस विभागाचा ना हरकत दाखला घेऊन नंतरच महापालिकेच्या विभाग कार्यालयातून परवानगी देण्याची कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली.
श्रीगणेशमूर्ती विसर्जनस्थळांवरील तराफे, फोर्कलिफ्ट, स्वयंसेवक, लाईफगार्डस्, विद्युत, अग्निशमन, आरोग्य, स्वच्छता, औषध फवारणी, मंडप, स्टेज व्यवस्थेचाही आयुक्तांनी विभागनिहाय आढावा घेतला. विसर्जनस्थळांकडे जाणा-या रस्त्याची दुरूस्ती, वृक्ष छाटणी बाबतही त्यांनी संबंधित विभागांस निर्देश दिले.
श्रीगणेशोत्सव मंडळांनी स्टेज, मंडप उभारण्याची कार्यवाही मा.उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे करावयाची असून मंडप, स्टेज व कमानी उभारताना रस्त्यांवर खड्डे होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे तसेच खांब रोवण्याकरीता वाळूच्या ड्रमचा वापर करावयाचा आहे तसेच उत्सवी कमानीची उंची 22 फूटापेक्षा कमी नसावी.
दुर्दैवीरित्या कोणतीही दुर्घटना घडून उत्सवाला गालबोट लागू नये याकरीता मंडळांनी आवश्यक ती काळजी घ्यावयाची असून नोंदणीकृत कंत्राटदाराकडूनच विद्युत विषयक कामे करुन घ्यावयाची आहेत. अनधिकृतपणे विद्युत पुरवठा कोणीही घेऊ नये तसेच उत्सवातील ध्वनीक्षेपक यंत्रणेचा त्रास परिसरातील नागरिकांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, अभ्यास करणारे विद्यार्थी इत्यादींना होणार नाही याची दक्षता घ्यावी. यादृष्टीने ध्वनी प्रदूषण अधिनियम व मा. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.अशा सर्व गोष्टींबाबत गणेशोत्सव मंडळांना विभाग कार्यालयांमार्फत माहि ती देणे व आवाहन करणे याविषयी आयुक्तांनी मौलिक सूचना केल्या.
उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवी मुंबई पोलीस दल सक्षमतेने कार्यरत असेलच त्यांना श्रीगणेशमुर्तीची, मंडपाची व परिसराची सुरक्षा (सीसीटिव्ही लावणे, आवश्यक स्वयंसेवक व्यवस्था ठेवणे इ.) तसेच गर्दीचे नियोजन करणे याबाबत मंडळांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले.
श्रीगणेशाच्या मूर्ती या पारंपारिक पध्दतीने पर्यावरण पूरक शाडूच्या मातीच्या इकोफ्रेंडली असाव्यात व त्यांची उंचीही मर्यादीत असावी असे आवाहन करतानाच महानगरपालिकेमार्फत आयोजित श्रीगणेश दर्शन स्पर्धेत इकोफ्रेंडली श्रीगणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहनपर पुरस्कार द्यावेत असे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सांगितले. सर्व श्रीगणेशोत्सव मंडळांनी आवश्यक त्या परवानगी घेऊन, कायदा व सुव्यवस्थेची जपणुक करीत, सुनियोजितरित्या श्रीगणेशोत्सव आयोजनाकरीता नवी मुंबई महानगरपालिकेस संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.