वाशी / वार्ताहर
वाशी, से-9-ए, येथील नियोजित भाजी मंडई बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून साकारण्यात येत आहे. या कामाचा भूमीपुजन सोहळा नुकताच वाशी येथे संपन्न झाला. या भाजीमंडईच्या उभारणीसाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
गेली अनेक वर्षे इथल्या भाजी विव्रेत्यांना भेडसावत असणार्या समस्यांविषयी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी काही महिन्यांपूर्वी सदर परिसराचा दौरा केला होता. त्यावेळी तेथील भाजी विक्रेत्यांना त्याच ठिकाणी आमदार निधीमधून भाजी मंडई उभारण्याचे आश्वासन आमदार म्हात्रे यांनी दिले होते. फेरीवाल्यांसाठी आपण सदैव तयार असून विरोधकांच्या विरोधाला न जुमानता सुसज्ज दैनंदिन बाजार मंडई उभारत आहे. सर्व फेरीवाल्यांना गाळे मिळाले पाहिजेत आणि ते मिळतीलच, असेही आ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
मार्केटचा पुनर्विकास कोणीही रोखू शकणार नाही. भाजी विव्रेत्यांकडून कोणी अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी हप्ता मागत असेल तर तात्काळ संपर्क करावा. तसेच व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवून ग्राहकांना भाज्या वाजवी दरात कशा मिळतील याची दक्षता घेऊन आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही त्यांनी भाजी विव्रेत्यांना केले. तर आ. मंदाताई म्हात्रे यांनी कधी पक्ष पाहिला नाही. गरीब फेरीवाल्यांसाठी झटणार्या त्या पहिल्या नेत्या असल्याचे मार्केटचे अध्यक्ष सय्यद फकीरा यांनी सांगितले. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी काही महिन्यांपूर्वी दौरा केला होता, त्यावेळी त्यांनी आम्हाला आमदार निधीमधून भाजी मंडई उभारण्याचे आश्वासन दिले होते. तो शब्द आमदार म्हात्रेंनी तंतोतंत पाळल्याबाबत भाजी विव्रेत्यांनी मंदाताइ म्हात्रे यांचे आभार मानले.
याप्रसंगी महापालिकेचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, शाखा अभियंता बंधू शिरोसे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, मारुती भोईर, विक्रम पराजुली, नगरसेवक सुनील पाटील, माजी नगरसेवक जितेंद्र कांबळी, भाजयुमोचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, भाजी मार्केट अध्यक्ष सय्यद फकीरा, सचिव बोरकर, प्रमिला खडसे, विकास सोरटे, अजय बोहरा, उदयवीर सिंग, शशी भानुशाली, कीर्ती राणा तसेच असंख्य फेरीवाले उपस्थित होते.