नवी मुंबई : तीस ते चाळीस रुपये किलोने मिळणारे लालबुंद टोमॅटो आता बाजारातून नाहीसे झाले आहेत. किरकोळ दर्जाच्या टोमॅटोंच्या दरांनीही आता शंभरी पार केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत टोमॅटोचे हे दर चढे राहण्याची शक्यता आहे. ‘टोस्पो’ विषाणूची लागण झाल्यामुळे तसेच काही ठिकाणी या विषाणूच्या संसर्गाच्या धास्तीमुळे टोमॅटोचे उन्हाळी पीकच न घेतल्यामुळे टोमॅटोचे उत्पादन साफ कोसळले आहे. त्याचा परिणाम मुंबईच्या एकूण पुरवठ्यावर होऊन टोमॅटोने शंभरीच्या पार उसळी मारली आहे. महागडे टोमॅटो विकत घेण्यापेक्षा त्याची कसर लिंबू, कोकम, चिंच या इतर आंबट पर्यायांवर गृहिणींनी भरून काढली आहे.
महाराष्ट्रात टोमॅटोचे लागवड क्षेत्र अडीच ते तीन लाख हेक्टर इतके आहे. सांगली, सातारा, नारायणगाव, जुन्नर, बीडमधील काही भागांमध्येही उन्हाळ्यात टोमॅटोची लागवड करण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र वाढत्या उष्म्यामध्ये टोस्पो या विषाणूची लागण होण्याचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. लागवडीनंतर पिकावर ४५ दिवसांनी हा विषाणूचा प्रभाव दिसून येत असल्याने त्यावर नियंत्रण कसे आाणायचे या प्रश्नानेही टोमॅटो उत्पादकांना हैराण केले आहे. या विषाणूच्या संसर्गाच्या धास्तीमुळे महाराष्ट्रात ज्या भागातून सर्वाधिक टोमॅटोचे उत्पादन मिळते तेथील यंदा लागवडीचे क्षेत्र ७५ टक्क्यांहून अधिक प्रमाणात घटले आहे. त्यामुळे मुंबईला होणारा साधारणतः पाच ते सहा हजार मेट्रिक टन इतका टोमॅटोचा पुरवठा ७० टक्क्यांनी कमी झाला आहे. दोन दिवसापूर्वीच मुंबईतील एका व्यापार्यांने घरापुढे उभ्या केलेल्या टेम्पोतून तब्बल तीन लाख रूपयांची टॉमटो चोरीला गेली आहेत. पोलिसांना अजूनही या प्रकरणाचा छडा लागलेला नाही.