स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : पावसाळ्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याने महापालिका प्रभाग 87 मधील नेरूळ सेक्टर 8 आणि 10 परिसरात महापालिका प्रशासनाने घरटी तसेच वाणिज्यिक क्षेत्रात जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी शिवसेना नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या पावसाळा सुरू आहे. नवी मुंबई शहराची निर्मिती ही खाडीकिनारी व खाडीअंर्तगत भागात भराव टाकून झालेली आहे, हे आपणास माहिती असेलच. पावसाळ्यात दरवर्षी नवी मुंबईत दरवर्षी ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्ल्यू आदी साथीचे आजार मोठ्या प्रमाणात बळावतात. दवाखान्यात सध्या तापाचे व रूग्णालयात मलेरियाचे तसेच स्वाईन फ्ल्यूचे रूग्ण दिसून येवू लागले आहेत. साथीच्या आजार होण्यापेक्षा हे आजार होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हितावह आहे. प्रभागातील रहीवाशांना साथीच्या आजाराविषयी मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाने रहीवाशांकरिता साथीच्या आजारांविषयी लवकरात लवकर मार्गदर्शन मोहीम सुरू करण्याची मागणी नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांनी निवेदनात केली आहे.
घरामध्ये काय असावे, काय नसावे, अडगळीच्या वस्तू कशा हानीकारक आहे, पाणी साचू नये, आजार अंगावर काढू नये, सोसायटी आवारात पाणी साचेल असे खड्डे असू नये, डासांना पोषक वातावरण निर्मितीस मदत करू नये याबाबत आपण घरटी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. याशिवाय चौकाचौकात तसेच परिसरात अन्य ठिकाणी हॉटेल, किराणा माल दुकाने व अन्य दुकाने अशा वाणिज्यिक वापराच्या ठिकाणीही मार्गदर्शन करावे. याशिवाय पथनाट्यातून व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी, भित्तीपत्रकेही जागोजागी लावण्यात यावी. परिसरातील रहीवाशांच्या आरोग्य रक्षणासाठी साथीच्या आजाराविरोधात पालिका प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद आवश्यक असल्याचे नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांनी म्हटले आहे,
रहीवाशांना अल्प प्रमाणात का होईना साथीच्या आजारांना लागण झाली आहे. उद्या या आजारांचा उद्रेक होवून हानी होण्यापेक्षा समस्येचे गांभीर्य लक्षात घेता आपण संबंधितांना साथीच्या आजाराविषयी प्रभाग 87 मधील नेरूळ सेक्टर 8 व 10 परिसरात व्यापक प्रमाणावर मार्गदर्शन मोहीम उघडण्याचे निर्देश देण्याची मागणी नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांनी केली आहे.