माझ्या पाठपुराव्यामुळे किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी टप्प्या टप्प्यात ४ कोटी २९ लक्ष रुपयांची शासनाची तरतूद
दिलखुलास कार्यक्रमात आमदार नरेंद्र पवार यांचे वक्तव्य
कल्याण : ऐतिहासिक कल्याण शहराच्या पाऊलखुणा जपण्यासाठी मी शासनाच्या पर्यटन विकास महामंडळ आणि पुरातत्वीय विभागाकडे विशेष पाठपुरावा करीत आहे. याचाच भाग म्हणून ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या जीर्णोद्धाराबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर राज्याच्या पर्यटन विकास महामंडळाकडून ४ कोटी २९ लक्ष रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. यातील सुमारे १ कोटी २९ लक्ष रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले. यामध्ये तातडीने निधीच्या प्रत्यक्ष कामाबाबतची निविदा प्रक्रिया आणि समंत्रक नेमणूक आदी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून काम सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे किल्ले दुर्गाडीच्या दुरवस्थेबाबत शिवसेनेला आंदोलन करण्याची मुळात गरजच नाही असे वक्तव्य आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण डोंबिवली पत्रकार संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिलखुलास’ कार्यक्रमात केले. ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे आमदार नरेंद्र पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना आपल्या आंदोलनाबाबत काय भूमिका घेते ? हे पाहणे गरजेचे आहे.
कल्याण डोंबिवली पत्रकार संघाच्यावतीने पश्चिमेतील महाजनवाडी सभागृहात भाजपा प्रदेश सचिव व कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार नरेंद्र पवार तसेच त्यांच्या सहचारिणी हेमाताई नरेंद्र पवार यांच्याशी पत्रकार – नागरिकांच्या ‘दिलखुलास गप्पा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार नरेंद्र पवार यांच्या शुभहस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पत्रकार आणि नागरिकांचे असे तब्बल ३० हून अधिक विकासाचे प्रश्न पत्रकारांच्या पॅनेल माध्यमातून विचारण्यात आले. या पत्रकारांच्या पॅनेलमध्ये पत्रकार संघाचे अध्यक्ष पुण्यनगरीचे पत्रकार विजय राऊत, पत्रकार संघाचे कल्याण विभागाचे अध्यक्ष झी 24 तास वृत्तवाहिनेचे पत्रकार विशाल वैद्य, ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे, दैनिक सकाळच्या पत्रकार मयुरी चव्हाण, दैनिक लोकमतचे पत्रकार अरविंद म्हात्रे यांनी काम केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून दैनिक प्रहारचे कल्याण – डोंबिवली प्रतिनिधी गणेश पोखरकर यांनी काम पहिले.
दरम्यान या कार्यक्रमात आमदार नरेंद्र पवार आणि त्यांच्या सहचारिणी हेमा नरेंद्र पवार यांनी अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली. संघाच्या मुशीतून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामातून राजकीय कारकीर्द फुलवलेल्या आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या जीवनातील अनेक संघर्षमय आणि गमतीदार किस्से उपस्थितांना सांगितले. यावेळी आमदार पद मिळाल्यानंतर कल्याण शहरातील वाहतूक कोंडी, आधारवाडी क्षेपनभूमी कायमस्वरूपी बंद करणे – घनकचरा व्यवस्थापणाबाबत नियोजन, स्टेशन परिसरातील फेरीवाले हटवून – परिसर स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महापालिका रुग्णालये सक्षम करणे याचकामांना प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीरभाऊ मुंगटीवार यांच्या सहकार्यामुळे विधासभा मतदार संघासाठी तब्बल ३० कोटींचा विशेष विकास निधी मंजूर करून शहरात उद्याने – नेचर पार्क विकसित करणे, तलाव सुशोभिकरण आणि ग्रामीणसह – शहरी भागातील मुलभूत सेवा सुविधांबाबतची विकासकामे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. आधारवाडी क्षेपनभूमी कायमस्वरूपी बंद करून घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक सुमारे १४० कोटी निधीत राज्य सरकारचा सहभाग वाढवून महापालिकेवरील आर्थिक बोजा कमी करण्यास यश मिळाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे किल्ले दुर्गाडीच्या विकासासाठी शासनाच्या पुरात्वीय विभागाच्या सहकार्याने पर्यटन विकास मह्मंडळाकडून तब्बल ४ कोटी २९ लक्ष मंजूर करून त्यातील १ कोटी २९ लक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.