** भाजप उमेदवारीसाठी प्रचंड चुरस ** २७५ इच्छुकांचे अर्ज दाखल
स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
ठाणे : मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारीसाठी प्रचंड चुरस असून, आतापर्यंत भाजपच्या उमेदवारीसाठी २७५ इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे या इच्छुकामध्ये पक्षबदल केलेल्या रजनिकांत मेहता यांचा देखील समावेश असून मुलाखतींचा कार्यक्रम २४ जुलै रोजी भाजपच्या जिल्हा कार्यालयात पार पडणार अाहे.
भाजपमध्ये उमेदवारीसाठी प्रचंड चुरस असून उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत कोण बाजी मारतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याबाबत बोलताना, महापालिकेत स्थानिकांसोबत समाजाच्या प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व मिळावे, या भुमिकेतूनच उमेदवारीचे वाटप होईल, अशी हमी आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या तीन वर्षातील कामाच्या धडाक्यामुळे भाजपची विकासाप्रती असलेली बांधिलकी स्पष्ट झाली अाहे. विकासाची हीच गंगा मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रापर्यंत आणावी, यासाठी भाजप कटिबद्ध असून त्यानुसारच उमेदवारीचे वाटप होणार आहे. मिरा भाईंदर शहरातून अनेक इच्छुक आणि पात्र लोक उमेदवारीसाठी प्रयत्नशील असून, समाजाच्या प्रत्येक घटकाला त्याद्वारे प्राधान्य मिळावे, असा आमचा प्रयत्न असल्याचे मा. आमदार नरेंद्र मेहता म्हणाले. आतापर्यंत आलेल्या २७५ इच्छुकांच्या अर्जात महिलांची संख्या अधिक असून त्यामध्ये तरुण, व्यावसायिक, उद्योजक, सनदी लेखापाल, डाॅक्टर, अभियंता या सर्व घटकांचा समावेश आहे. ही बाब लक्षात घेवून अधिकाधिक उत्तम उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. स्थानिक खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, संघटन मंत्री सतिश धोंड, मिरा भाईंदर शहर जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्यामार्फत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जिल्हा भाजप कार्यालयात घेतल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने लवकरच भाजपच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करू, असेही ते म्हणाले. गेल्या अनेक वर्षांची एकाधिकारशाही संपून सर्वसाधारण घटकाला प्रतिनिधीत्व मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.