मुंबई : मुंबई महापालिकेची पोल-खोल करणाऱ्या आरजे मलिष्कावर ५०० कोटींचा दावा ठोकणे म्हणजे शिवसेनेची बौद्धीक दिवाळखोरी निघाली आहे. त्यांच्या मेंदूत केवळ झोल-झोल असून त्यांची भूमिका गोल-गोल राहिली आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शिवसेनेवर केली.
काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येऊन पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्याची अपेक्षा असताना या दोन्ही पक्षामधील मतभेद समोर आले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठ फिरवली असली तरी सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषेद आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला समाजवादी पार्टीचे अबू आझमी, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे, कपिल पाटील उपस्थित होते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून आघाडीतील मित्र असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आणि स्वतंत्र पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. राज्य सरकारची भूमिका ही सातत्याने बदलत असून या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना जी १० हजार रुपयांची मदत घोषित केली त्यामध्ये खूप अडचणी आहेत. मुंबई विद्यापीठाचे पेपर तपासणीसाठी नागपूरला पाठवले, अजून काय-काय नागपूरला पाठवणार आहात?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मलिष्काच्या घरी अळ्या शोधण्याऐवजी पालिका अधिकारी ‘मातोश्री’वर गेले असते तर पालिकेवर लोकांचा विश्वास राहिला असता. बँकासमोर ढोल वाजवण्याची घोषणा करणाऱ्या शिवसेनेने मंत्रालयासमोर ढोल वाजवावा, असा टोला विखे पाटील यांनी शिवसेनेला हाणला.