नवी मुंबई : मागील शैक्षणिक वर्षात नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थीनींना वेळेत शैक्षणिक साहित्य न मिळाल्याने आरडओरड करणार्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थी-विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्याची रक्कम देण्याचा प्रस्ताव चक्क स्थगित ठेवल्याने राष्ट्रवादीच्या पूर्वीच्या आणि आताच्या भूमिकेतील विरोधाभासामुळे महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी 2017-18 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी-विद्यार्थीनींनी शैक्षणिक साहित्य खरेदी केल्यास त्यांच्या बँक खात्यात शालेय साहित्य खरेदीची रक्कम हस्तांतरित करण्याची मान्यता मिळावी, यासाठीचा प्रस्ताव 21 जुलै रोजी महापालिका स्थायी समिती बैठकीत मंजुरीसाठी आणला होता.
महापालिका शाळेत येणार्या विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या पालकांकडे त्यांचा दररोजचा उदनिर्वाह करण्याची स्थिती नसल्याने त्यांनी प्रथम स्वत:च्या पैशाने शालेय साहित्य घेतल्यावरच त्यांच्या खात्यात महापालिकाने पैसे टाकणे कितपत योग्य आहे, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असे या प्रस्तावावर चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेरूळमधील नगरसेवक व माजी उपमहापौर अशोक गावडे म्हणाले.
झोपडपट्टी आणि अन्य भागातून गरीब विद्यार्थी-विद्यार्थीनी महापालिका शाळेत येत असल्याने त्यांना प्रथम स्वत:च्या पैशाने शालेय साहित्य सक्ती करणे योग्य नाही, असे मत महापालिका स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी मांडले.
सदर प्रस्तावावर, अन्य नगरसेवकांनी अद्यापपर्यंत मागील वर्षी शालेय साहित्य खरेदीपोटी विद्यार्थी विद्यार्थीनींच्या खात्यात किती रक्कम हस्तांतरित केली याची विचारणा करीत, सध्या शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थी-विद्यार्थीनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असे निदर्शनास आणले. या चर्चेला महापालिका शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी उत्तर दिले.
यावर्षी 9 वी इय्यतेचा पाठ्यक्रम पुर्नरचित केला होता. त्यामुळे नववी इयत्तेची पुस्तके देण्यास उशीर झाला आहे. मात्र, शाळा सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी पहिली ते आठवी मधील विद्यार्थी विद्यार्थीनींना पुस्तके दिली आहेत. राज्यात शिक्षक भरतीला बंदी आहे. रिक्त पदे भरण्यासाठी उच्च न्यायालयात विनंती केली होती. ती न्यायालयाने मान्य केली होती. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. शालेय साहित्य महापालिका देत नाही. पालकांनी शालेय साहित्य खरेदी करून देयके सादर केल्यावर विद्यार्थी-विद्यार्थीनींनी देयके सादर केल्यावर शिक्षण विभागातर्फे त्यांच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित केली जाते, असे महापालिका शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी सांगितले.
स्वत:च्या पैशाने शालेय साहित्य घेतल्यावरच विद्यार्थी विद्यार्थीनींच्या खात्यात महापालिकाने रक्कम टाकण्याचा महाराष्ट्र राज्य शासनाचा आदेश आहे. अद्यापपर्यंत महापालिकाद्वारे 17 हजार 968 विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या बँक खात्यात 4 कोटी 89 हजार रुपये वर्ग केले आहेत, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी दिली.
महापालिका आयुक्तांनी मागील वर्षीचा अनुभव पाहता यावर्षी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यापूर्वीच विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या खात्यात पैसे वर्ग करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. याबाबत अद्याप शासनाकडून उत्तर न आल्याने सदर प्रस्ताव मंजुरीसाठी आणला आहे, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी सांगितले.
शैक्षणिक साहित्य खरेदी केल्यानंतर महापालिका शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सादर केलेल्या बिलांबाबत स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी आक्षेप घेतल्यावर अशोक गावडे यांनी 17 हजार 968 विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सादर केलेली बिले तपासायची असल्याचे सांगून तोपर्यंत सदर प्रस्ताव स्थगित ठेवण्यात यावा, अशी सूचना केली. त्यावर स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी सदर विषय स्थगित ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या पूर्वीच्या आणि आताच्या भूमिकेतील विरोधाभासामुळे आता यावर्षी देखील महापालिका शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्याचे पैसे मिळण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.