ठाणे : कल्याणमधील आधारवाडी कारागृहातून दोन कैद्यांनी पळ काढल्याची घटना आज सकाळी सहा वाजता घडली. जेलमधून पळून जाण्यात कैदी यशस्वी झाल्याने कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
कल्याणच्या पश्चिम भागात असलेल्या आधारवाडी कारागृहातील ही घटना असून मणिशंकर नाडर आणि डेव्हिड देवेंद्रन अशी पळून जाणाऱ्या दोन कैद्यांची नावे आहेत. हे दोघेही जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. आज सकाळी सहा वाजता अंधाराचा फायदा घेत या दोघांनी कारागृहातून पळ काढला. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. मणिशंकर नाडरला महात्मा फुले पोलिसांनी तर डेव्हिड देवेंद्रनला मुंब्रा पोलिसांनी अटक केली होती. या दोघांवर दरोडे व चोरीचे ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास या दोघांनी जेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायरचे दोरखंड बनवून कारागृहातील मागील बाजूस असलेल्या भिंतीवरून उड्या मारून पळ काढला. ही बाब तुरुंगातील पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या दोघांचा पाठलाग केला परंतु अंधाराचा फायदा घेत हे दोघे पसार झाले. या दोन्ही आरोपींचा खडकपाडा पोलीस शोध घेत आहेत.