स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
संघर्षच्या दणक्याने खड्डे बुजवण्यास प्रारंभ
पनवेल : पनवेल-सायन मार्गावर पडलेले खड्डे, त्यामुळे होणारे अपघात आणि वाहतुक कोंडीला कारणीभूत ठरवत सायन-पनवेल टोलवेज कंपनीविरोधात कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. आर. पोपेरे यांनी दिली.
पनवेल संघर्ष समितीने केलेल्या मागणीनंतर पोपेरे यांनी टोलवेज कंपनीला नोटीस बजावली होती. त्यानंतर 24 तासात अपघाताची मालिका कायम राहिल्याने आणि वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी विशेष प्रयत्न न केल्याने कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने पनवेल महापालिका आणि कळंबोली पोलिस ठाण्यात निवेदन देवून गणेशोत्सवापूर्वी मुख्य स्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी केली होती.
तत्पूर्वी महापालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांना केलेल्या विनंतीनुसार त्यांनी तात्काळ कार्यालयीन आदेश काढल्याने घोट गावापासून महापालिका क्षेत्रातील शहरे व प्रत्येक गावात खड्डे बुजवण्यास सुरुवात केली असल्याची माहिती मुख्य शहर अभियंता सुधीर कटेकर यांनी संघर्ष समितीला दिली आहे.
तर दुसरीकडे सायन-पनवेल महामार्गावरील खड्डे बुजवत काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणेही सुरू केले आहे.
खारघर-कोपरा येथील खड्डे भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने कंबर कसली आहे. पनवेल शहरासह इतर ठिकाणचे खड्डे महापालिका अग्रक्रमाने बुजवत असल्याने नागरिकांनी संघर्ष समितीचे आभार मानले आहेत.
गणेशोत्सवापूर्वी महापालिका क्षेत्रातील शहरे, गावे आणि पनवेल सायन मार्गावरील खड्डे भरले जाणार असल्याने बाप्पाच्या प्रवासातील विघ्न दूर होतील, अशी सुचिन्हे दिसत आहेत.