स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : राज्यात शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि महिलांवर होणारे अत्याचार या पार्श्वभूमीवर आपला 4 ऑगस्ट रोजीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्र्रेसचे ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी जाहिर केला आहे. सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन असल्याने आपण नवी मुंबईत कोणाला भेटू शकणार नसल्याचे संदीप नाईक यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून नवी मुंबईचे ओबामा या नावाने आमदार संदीप नाईक ओळखले जात आहे. नवी मुंबईचे विकासपर्व ही उपाधी नवी मुंबईकर जनतेने त्यांना बहाल केलेली आहे. या विकासपर्वाने केलेल्या विकासकामावर ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी शिक्कामोर्तब केल्यामुळे संदीप नाईकांना मोदी लाटेचा पाडाव करणे सहज शक्य झाले होते.
4 ऑगस्ट हा संदीप नाईकांचा जन्मदिवस नवी मुंबईत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. संदीप नाईकांना भेटण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड तसेच पश्चिम महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणावर हितचिंतकांचा लोढा येत असतो. वृक्षारोपण, रक्तदान, फळवाटप, वह्या वाटप, आरोग्य शिबिर यासह अन्य विविध सामाजिक उपक्रमांनी हा वाढदिवस संदीप नाईकांचे कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, मित्र परिवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी साजरा करत असतात.
राज्यात शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्यांनी व महिलांवरिल अत्याचारात सातत्याने वाढ होत असल्याने आमदार संदीप नाईक गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असून त्यांच्या संवेदनशील मनाला कमालीच्या वेदना होत आहेत. या विषयावर त्यांनी आपल्या व्यथा आणि भावना खासगीत तसेच सार्वजनिकरित्या व्यक्तही केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार संदीप नाईकांनी यंदाचा आपला 4 ऑगस्ट रोजी होणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. संदीप नाईकांच्या या निर्णयाचे नवी मुंबईत स्वागत करण्यात आले असून त्यांच्या या निर्णयामागे एक संवेदनशीलतेची झालर असल्याबाबत संदीप नाईकांची प्रशंसाही नवी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.