स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
मुंबई : जामखेड नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या त्या 14 नगरसेवकांनी आज पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार,विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही भेट झाली. मुख्यमंत्र्यांनी या नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भेट घेतलेल्या नगरसेवकांमध्ये रा.काँ.पा. चे 9, शिवसेनेचे 2 तर अपक्ष 3 नगसेवकांचा समावेश आहे.
दिड वर्षापूर्वी जामखेड नगरपरिषदेची निवडणूक झाली होती. त्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत असलेल्या नगरसेवकांनी एकत्र येऊन नगरपरिषदेत सत्ता स्थापन केली होती. मात्र दिड वर्षात नगराध्यक्ष व उप नगराध्यक्ष यांच्या मनमानी, निष्क्रिय कारभाराला नगरसेवक आणि जामखेडची जनता वैतागली होती. जामखेड शहरात पाणी आणि इतर नागरी सुविधांचे प्रश्न या सत्ताधाऱ्यांना सोडविता आले नाहीत. या बद्दल जनतेमध्ये असंतोष होता. याउलट पालकमंत्री प्रा. राम शिंदे सर्वपक्षीयांना बरोबर घेऊन जामखेड शहरात आणि तालुक्यात जनतेचे प्रश्न सोडवण्यात पुढे होते. पालकमंत्र्यांचा हा प्रतिसाद बघून या नगरसेवकांनी एकत्र येऊन पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला.
जलसंधारण आणि पालकमंत्री म्हणून प्रा.राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यात विक्रमी विकास निधी आणला. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून धडाकेबाज कामे केली. त्यामुळे जामखेड आणि परिसरातला पाणी प्रश्न सुटण्यास मदत झाली. रस्ते विकासासाठी मोठा निधी आल्याने रस्त्यांची कामे ही झाली. पालक मंत्र्यांच्या विकासकामांचा धडाका बघून भारतीय जनता पक्षाविषयी जामखेडकरांच्या मनात विश्वास निर्माण झाला. त्यातूनच या नगरसेवकांनी हा निर्णय घेतला.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या 14 नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेळके सुमन अशोक, राळेभात सुरेखा भाऊराव, वाव्हळ विद्या राजेश, गायकवाड लता संदीप, गुलचंद हिरामण अंधारे, गायकवाड संदीप सुरेश, खान फरीदा आसिफ, आजबे गणेश उत्तमराव यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या सय्यद समीर लतीफ आणि बांबरसे ऋषीकेश किसन,तर अपक्ष धनवडे विभिषन शामराव, निमोणकर महेश भारत आणि पवार राजेश्री मोहन यांनीही भेट घेतली. कर्जत जामखेड हा प्रा. राम शिंदे यांचा मतदार संघ आहे. याच मतदार संघातील कर्जत शहरात प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेत भाजपाची सत्ता आहे. कर्जत शहराचे पाणी, रस्ते आणि इतर नागरी प्रश्न पालकमंत्र्यांनी कसे सोडविले हे जामखेडकरांनी बघितले आहे. त्या धर्तीवरच कर्जतचा विकास होत आहे. मग आपले शहर मागे राहून काय उपयोग ? या विचारामुळे जामखेडमध्ये भाजप विषयी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. आता, हे 14 नगरसेवक सोबत आल्यामुळे प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेडकरांना अच्छे दिन येणार आहेत. यावेळी जामखेड भाजपा तालुका अध्यक्ष रविंद्र सुरवसे, भाजपा शहर अध्यक्ष सोमनाथ राळेभात, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, ॲड. प्रविण सानप, मनोज राऊत, केदार रसाळ, राहुल राऊत, केशव वनवे, गणेश राळेभात, राजेश वाव्हळ, मोहन पवार, शाकीर खान, भाऊराव राळेभात, संदीप भुतडा, बापू माने हे मान्यवर उपस्थित होते.