बेलापुर / वार्ताहर
बेलापुर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी 24 जुलै रोजी अचानक नेरूळ सेक्टर- 15 येथील नवी मुंबई महापालिका एम.एस.फकीर भाजी मंडईचा पाहणी दौरा केला. महापालिकेने फेरीवाल्यांकरिता फेरीवाला भूखंड उपलब्ध केला असला तरी त्याकरिता धोरण अजूनही तयार नाही. तेथे कोणतीही सोई-सुविधा पुरविल्या जात नाहीत. याच अनुषंगाने भाजी मंडईचा पाहणी दौरा करण्यात आला असे, आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
भाजी मंडईमध्ये सुमारे 50 ते 60 फेरीवाले व्यवसाय करीत असून, येथील प्रत्येक फेरीवाला सुविधांपासून वंचित आहे. प्रत्येक पक्षाचे व्यापारी येथे व्यवसाय करतात. काही गुंड प्रवृत्तीच्या पुढार्यांकडून भाजी मंडईतील फेरीवाल्यांना त्रास देण्यात येतो. सदर मार्केट सुसज्ज असे तयार करण्यात येऊन तेथे स्वतंत्र गृहे बांधण्यात येतील, याकरिता आमदार निधीतून निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी फेरीवाल्यांना दिले.
नागरिकांना फळ-भाजी मार्केटची गरज असून जात-पात न पाहता फेरीवाल्यांना प्रत्येक समस्या विषयी मदत करण्यात येईल. बरेच वर्षापासून फेरीवाले येथे व्यवसाय करीत असून त्यांना सर्व सोई-सुविधा मिळण्याचा त्यांचा हक्क असून, तो त्यांना मिळालाच पाहिजे, असेही आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
नेरूळ सेक्टर-15 मधील मार्केटच्या पुनर्विकासाचे काम बरेच वर्षापासून प्रलंबित आहे. सत्ताधारी पक्ष जाणून-बुजून कामात अडथला आणत आहेत. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडे मागणी केली असता, त्यांनी त्वरित मार्केटचे काम करून देते, फेरीवाल्यांना मार्केटबद्दल चिंता करण्याची गरज नाही, असे आश्वासन दिले आहे. वाशी येथील मार्केटचाही काही महिन्यापूर्वी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दौरा केला होता. वाशी येथील मार्केटच्या बांधकामाचे भूमिपूजनही करण्यात आले. जलद काम करणार्या आमदार आपण पहिल्यांदा पाहिल्या आहेत, असे यावेळी उपस्थित फेरीवाल्यांनी सांगितले.
याप्रसंगी नेरूळ जामा मशिदीचे ट्रस्टी कुरेशी, भाजपा महामंत्री डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, नगसेवक सुनील पाटील, अशोक चटर्जी, सुनील होनराव, प्रकाश महाडिक, सोनाली बनकर यांच्यासह असंख्य फेरीवाले उपस्थित होते.