स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
* संघर्ष समितीचा निर्वाणीचा इशारा
* सार्वजनिक बांधकाम खात्याचीही केली हजामत
पनवेल : गेल्या सहा दशकापूर्वीपासून हजारो कुशल कामगार घडविणाऱ्या पनवेल औद्योगिक संस्थेची इमारत भग्न अवस्थेतेच्या उंबरठय़ावर उभी असल्याने गुडघाभर पाण्यात बुडालेले यंत्र आणि त्यात तरंगणाऱ्या जीवंत विद्युत वाहिन्या अशा भयानक आणि तितक्याच धोकादायक परिस्थितीत विद्यार्थी शिक्षण घेत, परीक्षा देत आहेत. संघर्ष समितीकडे काही विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्याने समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी प्राचार्य आणि निदेशकांची भेट घेवून तीव्र नाराजी व्यक्त करत गंभीर इशारा दिला.
पनवेल शहराला खेटून 22 एकर विस्तीर्ण जागेत वर्क शॉपसह 18 प्रकारच्या विविध शाखांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सर्व इमारतींसह वर्क शॉपला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने प्रत्येक वर्गात अक्षरशः गुडघाभर पाणी साचत आहे. खिडक्यांची तावदाने पाहिली की, भंगारचे गोदाम यापेक्षा बरे असते, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया सहजपणे ओठांवरून बाहेर पडते.
राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या नकाशावर पनवेल औद्योगिक संस्था आहे की नाही, हा संशोधनाचा भाग ठरावा, इतकी भयावह अवस्था आहे. कोट्यवधी रुपयांची यंत्रणा पाण्यात बुडत आहे. त्यांना जोडल्या गेलेल्या जिवंत विद्युत वाहिन्यांचे जाळे त्या पाण्यावर तरंगत आहेत. अशा धोकादायक स्थितीत विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांना विजेचे सौम्य धक्के बसले आहेत. आयटीआय संस्थेला त्याचे फारसे गांभीर्यही वाटत नाही. राज्याचे संबंधीत खात्याचे मंत्री संभाजीराव निलंगेकर आणि राज्यमंत्री रणजीत पाटील यांना याबाबत सुतराम माहिती देण्यात आलेली आहे, असे वाटत नाही.
स्वच्छ भारत अभियान आणि आयटीआय संस्थेचा काही संबंध असावा, याचीही काही चिन्हे दिसत नाहीत. सद्यःस्थितीत 1,129 विद्यार्थी विविध शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. ते संस्थेतील गलिच्छपणा आणि हलगर्जीपणाला कंटाळले असून संस्थेला मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा आहे का, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.
त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, मंगल भारवड, अमित पंडित यांनी प्रभारी प्राचार्य एस. व्ही. पाटील यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या समवेत प्रभारी अतिरिक्त प्राचार्य एम. बी. पिल्ले, एम. बी. परदेशी आणि व्ही. के. मोरे आदीजण उपस्थित होते.
संघर्ष समितीने सविस्तर चर्चा करून संस्थेच्या इमारतीची भग्न अवस्था त्यांच्या समोर कथन केली. त्यांनी हे सर्व मान्य केले. संस्थेने उपसंचालक जाधव यांना माहिती दिली असल्याचेही सांगितले.
निदेशक परदेशी यांना सोबत घेवून संघर्षने सर्व परिसराची पाहणी केली. पावसाच्या पाण्यात भिजत असलेली यंत्रणा त्यांना दाखवली, तेव्हा पूर्वाश्रमीचे विद्यार्थी आणि आता निदेशक असलेल्या शिक्षकांनी खेद व्यक्त केला.
सध्या परीक्षा सुरू आहेत. 10 ऑगस्टला परीक्षा संपुष्टात येतील आणि त्यानंतर नवीन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती कांतीलाल कडू यांना प्राचार्य पाटील यांनी दिली. तेव्हा परीक्षा पूर्ण होवू द्या, पण इमारतींची पूर्णतः डागडुजी केली नाही तर पुढची प्रवेश प्रक्रिया रोखून धरणार आणि हलगर्जीपणाचा रितसर गुन्हा दाखल करणार असल्याचा गंभीर इशारा कडू यांनी दिला.
ही परिस्थिती बदलणार
………………………… ………….
इथे गेल्या चार महिन्यांपासून आपण कामगिरीवर आहोत.परिस्थिती अतिशय भयानक आणि धोकादायक आहे. ही बदलणे गरजेचे आहे. आम्ही आता जोमाने कामाला लागतो, परंतु परीक्षा होईपर्यंत सहकार्य करा, मग आपण सांगाल तसे करून हे चित्र बदलू.
-एस. व्ही. पाटील
प्रभारी प्राचार्य,
निधी नाही, आधीचे बिले थकीत
………………………… …………….
आयटीआय इमारतीच्या छप्पराला गेल्या तीन चार वर्षापासून गळती लागली आहे. आधीच्या तीन वर्षात टाकलेल्या ताडपत्रीच्या बिलाची रक्कम ठेकेदाराला अदा करता आली नाही. निधी नाही त्यामुळे गंभीर परिस्थिती आहे.
एस. एम. कांबळे
(विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम खाते)