स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना सरकारचे उत्तर
ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
मुंबई : 30 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील 13 हजार जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला उत्तर देताना म्हटले आहे.
शिक्षण विभागाने 30 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील 13 हजार जिल्हा परिषद शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झाला होता. विखे पाटील यांनी शुक्रवारी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या अन्याय्य निर्णयाकडे सरकारचे लक्ष वेधले. या निर्णयावर टीका करताना ते म्हणाले की, शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही मुल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, ही सरकारची जबाबदारी आहे. तसेच राहत्या घरापासून 1 किलोमीटर अंतराच्या आत शाळा देणे बंधनकारक आहे. परंतु, सरकारच्या नव्या आदेशामुळे विद्यार्थ्यांना शाळेसाठी 15-15 किलोमीटर दूरपर्यंत जावे लागणार आहे. यातून शाळा गळतीचे प्रमाण वाढण्याची भीती विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केली.
सरकारच्या सदरहू निर्णयामुळे पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 30 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 129 शाळा बंद करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. जपानमध्ये दूर्गम भागातील एका विद्यार्थींनीला शाळेत जाता यावे, यासाठी तेथील रेल्वे विभागाने त्या एका मुलीसाठी अनेक वर्ष आपली सेवा सुरू ठेवली आणि महाराष्ट्रात मात्र अनेक विद्यार्थी असतानाही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जात असल्याचे विखे पाटील यांनी सभागृहात सांगितले.
राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात पालघर जिल्ह्यातील श्रमजीवी संघटनेने विद्यार्थी व पालकांचा गुरूवार 27 जुलै रोजी पालघर येथे जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासनाने दप्तरे घेऊन जगायला बकऱ्या द्याव्यात, अशी मागणी त्या हतबल विद्यार्थ्यांनी लावून धरली, याकडेही विरोधी पक्षनेत्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
यासंदर्भात उत्तर देताना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सदरहू जिल्हा परिषद शाळा बंद करण्यासंदर्भातील निर्णय रद्द केल्याचे विधानसभेत जाहीर केले.