आमदार संदीप नाईक यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर
मुंबई : ज्या संस्थांनी रुग्णालयांसाठी सवलतीच्या दरात सिडको महामंडळांकडून भूखंड घेतले आहेत त्यांना कायद्याप्रमाणे १५ टक्के सवलतीच्या दरात गरीब रुग्णांवर उपचार करणे बंधनकारकच आहे, असे उत्तर आमदार संदीप नाईक यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले आहे.
अनेक संस्था सिडकोकडून सवलतीच्या किंमतीत रुग्णालय तसेच शैक्षणिक कारणांसाठी सवलतीच्या दरात भूखंड घेतात. मात्र या संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एखादी यंत्रणा आहे काय? नसेल तर आपण ती तयार करणार आहात काय? असा सवाल आमदार संदीप नाईक यांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. अनेक संस्था सिडकोकडून सवलतीच्या दरात आरक्षित भूखंड मिळवितात. या भूखंडांवर रुग्णालये तसेच शाळा आणि कॉलेजेस उभी बांधली जातात. मात्र नियमानुसार या रुग्णालयांमधून गरीब, स्थानिकांवर उपचार होत नाहीत. अशा शाळा-कॉलेजांमधून स्थानिक, गरीब तसेच प्रकल्पग्रस्तांना प्रवेश देताना डावलले जाते असा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर सवलतीच्या किंमतीचा लाभ घेवून सिडकोच्या भूखंडांवर उभारलेल्या रुग्णालयांमधून गरीब व स्थानिकांना प्राधान्याने उपचार मिळावेत तसेच शैक्षणिक प्रवेश प्राप्त व्हावेत यासाठी आमदार संदीप नाईक यांनी हा महत्वाचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर दिले. सवलतीच्या दरात सिडकोकडून भूखंड घेवून उभ्या केलेल्या रुग्णालयांमधून नियमाप्रमाणे १५ टक्के गरीब रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक आहे. अशा प्रकारचे उपचार या संस्था करतात की नाही हे पाहण्यासाठी शासनाची यंत्रणा देखील आहे. ज्या संस्था नियमांचे पालन करीत नाहीत, ज्या ठिकाणी अनियमितता होतेय, दिरंगाई होतेय अशा संस्थांची माहिती आमदार संदीप नाईक यांनी दिली तर त्या संस्थांवर नक्कीच कारवाई करु, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार संदीप नाईक यांना तोंडी उत्तरात दिली.