विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची संतप्त विचारणा
मुंबई : बेळगाव सिमाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील खटल्यासंदर्भात उदासीन भूमिका पाहता सिमावासियांबाबत राज्य सरकार गंभीर आहे का, अशी संतप्त विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केली.
सिमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होती. त्यावेळी कर्नाटकच्या वतीने त्यांच्या मंत्र्यांसह वरिष्ठ वकिल उपस्थित होते. महाराष्ट्राच्या वतीने मात्र एक कनिष्ठ वकिल हजर असल्याची बाब काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
याच मुद्यावर भूमिका मांडताना विखे पाटील म्हणाले की, ही बाब आता न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अधिक बोलणे संयुक्तिक ठरणार नाही. परंतु, या खटल्यामध्ये महाराष्ट्राची बाजू सक्षम करण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात अनेक निर्णय घेण्यात आले. हा खटला लढण्यासाठी वरिष्ठ वकिल नेमण्याचे निर्णय झाले. परंतु, आताचे सरकार याकडे गांभिर्याने पाहत नसल्याचा ठपका विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी ठेवला.