सुजित शिंदे : 9619197444
काँग्रेसच्या रवींद्र सावंतांच्या पाठपुराव्याला परिवहन उपक्रमाचा सकारात्मक प्रतिसाद
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका उपक्रमाने नेरूळ पश्चिमला एक महिन्यापूर्वी रिंगरूट बससेवा सुरू केली. या बससेवेला मिळत असलेला अपुरा प्रतिसाद आणि सानपाडा-जुईनगर व सीवूड्सच्या लोकांना नेरूळला जोडण्यासाठी काँग्रेसचे रोजगार व स्वंय रोजगार विभागाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत यांनी परिवहन उपक्रमाकडे ही बससेवा सानपाडा ते सीवूड्सपर्यत करण्याचा पाठपुरावा केला. या पाठपुराव्याची दखल परिवहन उपक्रमाने घेतल्यामुळे 3 ऑगस्टपासून नेरूळ पश्चिमची रिंगरूट बससेवा आता सानपाडा रेल्वे स्थानक ते सीवूडस सेक्टर 42 डेपो यादरम्यान धावणार असल्याची माहिती रवींद्र सावंत यांनी दिली.
नेरूळ पश्चिमला सुरू करण्यात आलेली ही रिंगरूट बससेवा परिवहन उपक्रमाला आर्थिकदृष्ट्या फायदेशीरही ठरत नसल्याचे सांगत लेखी निवेदनात रवींद्र सावंत यांनी भविष्यात अपुर्या प्रवासी सेवेचे कारण पुढे करून परिवहन उपक्रम ही बससेवा बंद करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीतीही निवेदनातून व्यक्त केली होती.
ही रिंगरूट बससेवा भविष्यात बंद न करता त्याऐवजी या बससेवेचा मार्ग सानपाडा रेल्वे स्थानक ते जुईनगरचे डी-मार्ट, जुईनगर रेल्वे स्थानक व त्यानंतर पुढे नेरूळ पश्चिमचा आहे तोच रिंगरूट मार्ग करत ही बससेवा सीवूडस रेल्वे स्थानकापर्यत घेवून गेल्यास या बससेवेचा खर्या अर्थांने सानपाडा, जुईनगर, नेरूळ आणि सीवूड्स या चारही भागातील लोकांना फायदा होईल. तसेच परिवहन उपक्रमालाही या प्रवासी सेवेचे उत्पन्न प्राप्त होईल. शनिवार, रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी हीच बससेवा सीवूड्स रेल्वे स्थानकापासून पुढे सीवूडस सुधाकरराव नाईक उड्डाणपुलावर वंडर्स पार्क या ठिकाणापर्यत वाढविण्यात यावी की जेणेकरून सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीवूड्स परिसरातील मुलांना व त्यांच्या पालकांना वंडर्स पार्क या ठिकाणी जाणे उपयुक्त ठरेल. हा मार्ग सर्व रहीवाशांना सोयीचा व उपक्रमासही फायदेर्शीर ठरेल. जुईनगर, सानपाडा, सीवूडसच्या रहीवाशांना नेरूळ पश्चिम भागात पाहिजे त्या ठिकाणी सोयिस्कर ठरणार असल्याचे रवींद्र सावंत यांनी लेखी पाठपुरावा करताना परिवहन उपक्रमाच्या निदर्शनास आणून दिले.
शिवसेनेच्या पाठपुराव्याने सुरू झालेल्या या रिंगरूट सेवेला सुरू करण्याच्या श्रेयवादावरून एका परिवहन सदस्यांनेच खो घातला आणि आता काँग्रेसच्या पदाधिकार्यांने रिंगरूट बससेवा सानपाडा ते सीवूडसपर्यत वाढविल्याची उलटसूलट चर्चा पालिका मुख्यालयात सुरू आहे.