* जकात नाक्याच्या जागेवर भूमाफियांचे अतिक्रमण होवू नये याची दक्षता घेण्याची आमदार मंदाताईंची सूचना
* बसटर्मिनस उभारल्यास रस्त्यावर वाहने उभे राहण्यास व अपघातांना आळा बसणार
नवी मुंबई: सायन-पनवेल हायवेवर वाशी आणि मानखुर्दच्या मध्ये वाशी जकात नाका गेली अनेक वर्षे सुरु होता. परंतु, राज्य शासनाने नुकताच राज्यातील सर्व जकात नाके बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर
सदर जकात नाका बंद करण्यात आला आहे. सदर जकात नाका बंद झाल्यामुळे त्याच्या वापरात असलेली सुमारे 4 एकर पेक्षाही अधिक जागा मोकळी करण्यात आलेली आहे. या मोकळ्या जागेत बस टर्मिनस उभारण्याची मागणी बेलापूरच्या भाजपा आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे विधानसभेत केली.
बाहेरील राज्यातून आलेल्या अनेक बसेस या महामार्गावर रस्त्यावर उभ्या असतात. बस टर्मिनस उभारल्यास अपघातालाही आळा बसेल. याकरिता जकात नाक्याच्या सदर जागेत बस टर्मिनस उभारण्याची मागणी विधानसभेत केली असल्याचे आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले.
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणार्या मध्यवर्ती ठिकाणावर सदरची जागा असल्यामुळे या जागेचा वापर बस टर्मिनस करिता होऊ शकेल, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. सदर जागा मोकळी असल्याकारणाने तेथे कोणतेही अतिक्रमण होऊ नये, अनधिकृत झोपडपटट्ट्या तसेच भूमाफियांचा कब्जा होऊ नये याकरिता जकात नाक्याचा भूखंड आरक्षित करणे गरजेचे असल्याचे सौ. मंदा म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच राज्याबाहेरील अनेक बसेस मुंबईमध्ये प्रवासी वाहतूक करीत असतात. मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी बस टर्मिनस उभारल्यास महामार्गालगत उभ्या राहणार्या प्रवासी बसेसना स्वतंत्र असे स्थानक उपलब्ध होण्याची शक्यता आमदार मंदा म्हात्रेंच्या मागणीमुळे निर्माण झाली आहे.